संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत कोपरी पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही- मनसे

 ठाणे :  पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी ठाणे कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु यापैकी एका मार्गिकेवर तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा पूल भविष्यात धोकादायक ठरू शकतो. सुरुवातीलाच पुलाला तडे गेल्याने यावर वाहनांची ये-जा सुरु झाल्यास तो कधीही कोसळू शकतो ही  बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणून दिली आहे. 

 या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि राज्य सरकारच्या विरोधात टाळ, मृदुंग आणि ढोलकी वाजवत आंदोलन केले.  या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असता पोलिसात आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाचीदेखील झाली. मात्र या पुलाबाबत संबंधितांवर कारवाई होत नाही तोवर पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मनसेने घेतल्याने ठाण्यातील वातावरण गंभीर झाले आहे. आंदोलन करणाऱ्या 50 ते 60 मनसे पदाधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पुलाचे चार लेनचे बांधकाम पूर्णत्वास येत असून यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. याच पुलावरून रोज हजारो वाहने विशेषतः अवजड वाहने ये-जा करणार आहेत. या पुलाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे कळते. या नव्या कोऱ्या लेनवर आडवे मोठे तडे गेले असून पुलाला असलेल्या काँक्रीटच्या अँटी क्रॅश बॅरिअरलाही तडे गेले आहेत. विशेष म्हणजे पुलाखाली असलेले कपस्टोनही तुटलेले दिसत असून हा भाग कमकुवत झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करणार असून अवजड वाहनेही यावरून जाणार आहेत. पुलाची दैना पाहता आम्ही हे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला असून आयआयटीमार्फत या पुलाच्या बांधकामाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या