
वाढलेल्या इंधन दरामुळे प्रवासखर्चात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. एकीकडे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. १००पार करूनही पेट्रोलची दरवाढ थांबत नाही. यासाठी मोठ-मोठे राजकीय पक्ष आंदोलन करीत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेकरिता ठरावीक वेळात लोकल सुरु करण्यासाकरिता कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. पेट्रोल दरवाढीबाबत कितीही आंदोलने, मोर्चे काढले तरी ती काही थांबण्याचे नाव घेत नाही. परंतु सर्वसामान्यांकरिता लोकलसेवा सुरु करणे हे इथल्या राज्यकर्त्यांच्या हातात आहे. त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य जनता करीत आहे.
सामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सर्वांना लोकलमुभा दिल्यास गर्दी वाढून करोना पुन्हा बळावण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्त सामान्य नागरिकांना जलमय-खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. आणि वाढणाऱ्या इंथनदरवाढीचाही सामना करावा लागणार आहे. . कल्याण, ठाणे, डोंबिवली, बोरिवली, अंधेरी मालाड येथून मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या हा नोकरदार वर्ग रस्तेप्रवासावरच अवलंबून आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने रस्तेमार्गे प्रवास करताना तासनतास खोळंबून रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. कामावर गेला नाही तर घर कसे चालणार या भीतीपोटी खड्ड्यातून मार्ग काढत इंधनाची दरवाढ झेलत तो जीवन जगत असल्याचे चित्र सध्या मुंबई ठाण्यामध्ये दिसत आहे.
लोकल सुरू करण्याचा अधिकार राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे होता. त्यानुसार सर्व महिलांसाठी लोकल सुरू करण्याचे लेखी आदेश सरकारने दिले. गर्दीचे कारण देत सर्व महिलांना प्रवासमुभा नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. आता लोकल सुरू करण्याचे अधिकार महापालिकेकडे आहे. राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंधात मोकळीक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्वी तिसऱ्या टप्प्यात असलेली मुंबईची स्थिती आणखी सुधारली आहे. मात्र लोकलबंदी कायम आहे.
0 टिप्पण्या