ठाणेकरांना २७ एप्रिल २०२६ पर्यंत नावासह जन्मनोंदणीची संधी

ठाणे 

         शाळा-महाविद्यालयांत प्रवेश असो की नोकरी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखल्याची आवश्यकता असते. पूर्वीच्या तुलनेत सध्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. पूर्वीच्या काळी गर्भवती मातांसाठी प्रसूती व्यवस्था नसल्याने घरातच प्रसूती होत असल्यामुळे बाळाच्या जन्माची नोंद शक्यतो केली जात नसे.  तर शहरी भागातही प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या बाळांच्या जन्माची नोंद रुग्णालयातर्फे होऊनही अनेकांनी जन्मदाखले घेतलेले नसतात. यामुळे नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्मनोंदणीमध्ये नावाची नोंद करुन जन्म दाखले मिळवण्याची संधी आता मिळणार आहे.

शाळा-महाविद्यालयांत प्रवेश, नोकरी तसेच पासपोर्ट अशा सर्व महत्वाच्या कामी जन्मदाखला अत्यावश्यक असल्याने आता 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या नावासह जन्माची नोंद करुन 27 एप्रिल 2026 पर्यंत दाखला मिळविण्याची नवीन संधी मिळणार असून नागरिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान नावासह जन्मनोंदणीची ही अखेरची संधी असून, 27 एप्रिल 2026 नंतर नावासह जन्मनोंदणी करता येणार नाही.       आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी अधिसूचनेनुसार ज्यांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झाली आहे, ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षांचा कालावधी लोटला आहे, अशांना जन्मनोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्मनोंद करता येणार असून, ही मुदत केवळ 27 एप्रिल 2026 पर्यंतच आहे, अशी सूचना देण्यात आली आहे.

      ठाणे महापालिकेच्यावतीने जन्मनोंदीपासून वंचित नागरिकांना नेहमीच विनामुल्य सहकार्य केले जाते. तरीही जन्मनोंदीची नोंद पालिकेच्या रजिस्टरमध्ये नसल्यास जन्म व मृत्यू विभागाकडून अनुपलब्धता प्रमाणपत्र घेऊन जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मिळवता येणार आहे.        त्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याच्या दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड यापैकी दोन पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावयाचा आहे. नवजात बालकांसाठी वर्षभराच्या आत मोफत जन्म दाखल्याची प्रथम प्रत मोफत आणि पुढील प्रत्येक प्रतीसाठी 20 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येते. त्याच धर्तीवर अर्ज करणाऱ्या नागरिकांना 20 रुपये शुल्क, पाच रुपये विलंब शुल्क आकारुन जन्मनोंदीची प्रमाणपत्र मिळणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA