मुंबई - कुलाबा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांनी डॉ. आंबेडकर नगर येथील स्थानिक नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलीस महासंचालक , मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. तसेच आमदार नार्वेकर यांनी स्थानिक परिसरातील विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तसेच जातीवाचक अपशब्द वापरला असल्याचेही तक्रारीत म्हटले असून आमदार नार्वेकर यांच्या विरोधात अट्रोसीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी प्रशांत घाडगे यांच्यासह शेकडो स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पोलिस महासंचालक , मुख्यमंत्री , गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व गणेशमूर्ती नगर को ऑप हाउसिंग सोसायटी बॅक बे कुलाबा मर्यादित या गृहनिर्माण संस्था अंतर्गत या संपर्ण भागात सीसीटिव्ही लावण्याचे नियोजन केले होते. याला विरोध म्हणून स्थानिक आमदार नार्वेकर हे स्वतः या ठिकाणी आले. या भागात सीसीटिव्ही लावण्यास त्यांनी मज्जाव केला. तसेच याबाबत आमदार नार्वेकर हे म्हाडा अधिकाऱ्यांशी मोबाईल वर बोलत असताना त्यांनी हे झोपडपट्टीतील भंगी लोक आहेत. असा अपशब्द वापरला त्यानंतर काही वेळात त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी पाठविले त्यांनीही लोकांनां दमदाटी केली व हे लोक भंगी आहेत. यांना जवळ करू नका असे म्हणत जातीय शिवीगाळ केली त्यामुळे येथील एक विशिष्ठ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून आमदार नार्वेकर यांच्यावर अट्रोसिटि अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी प्रशांत घाडगे व स्थानिक रहिवाशांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
भंगी असा जातीय शिवीगाळ शब्द वापरल्यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत संबंधित म्हाडा अधिकारी तसेच स्थानिक पोलीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र आमदार नार्वेकर यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही असे घाडगे यांनी निवेदनात म्हटले आहे. नार्वेकर हे स्थानिक आमदार असूनही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी असफल ठरले आहेत. उलट या सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यास विरोध करून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडवून या ठिकाणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? तसेच कसाब याने मुंबईवर हल्ला केला होता. याच भागातून मुंबईत दहशतवादी शिरले होते. त्यामुळे नार्वेकर हे अशा दहशतवादी लोकांना किंवा त्यांच्या कृत्यांना पाठीशी घालन्याचा प्रयत्न तर करीत नाही ना असा प्रश्न घाडगे यांनी उपस्थित केला असून आमदार नार्वेकर. यांच्याकडून जिवाला धोका असल्याचेही घडणे यांनी पोलिस महासंचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या