Trending

6/recent/ticker-posts

‘तौक्ते’ चक्रीवादळ ; जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने दक्ष राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

   हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात ‘तौक्ते’ नावाचे चक्रीवादळ मुंबई तसेच जवळच्या समुद्रातून जाणार असून त्याचा प्रभाव हा काही प्रमाणात मुंबई, ठाणे येथील वातावरणावर होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगाने वारे वाहण्यासह पर्जन्यवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने दक्ष राहण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. पाऊस, अतिवृष्टी, वान्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, विद्युत पुरवठा विखंडीत होणे या बाबत योग्य ती उपाययोजना त्वरीत करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याबाबतची माहिती पाठवण्यात येत असून त्यानुसार उपाययोजना कराव्यात. मच्छीमार संघटनाद्वारे उत्तन आणि आसपासच्या मच्छिमारांना समुद्रामध्ये मासेमारीकरीता मज्जाव करण्यात यावा आणि समुद्रात गेलेल्या बोटी तात्काळ नजीकच्या किना-याजवळ पोचण्याबाबत संदेश देवून पोचल्याची खात्री करावी. 

चक्रीवादळापासून निर्माण होण्याच्या धोक्यामूळे किनारपट्टी लगत तसंच सखल भागात वास्तव्यास असणा-या कच्च्या स्वरूपाच्या घरांमधील रहिवाशांना स्थलांतरीत करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. नागरीकांना हलविण्यात येणारी ठिकाणे निर्जंतुक करावी. त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि आवश्यक खाद्यसामुग्रीची व्यवस्था करावी. शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालये यांना सज्ज राहणेबाबत तसेच आवश्यक ते वैद्यकीय पथक, औषध पुरवठा उपलब्ध करुन ठेवण्याबाबत सुचना द्याव्यात.

 धोकादायक इलेक्ट्रीक पोलचे सर्वेक्षण करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वादळामुळे विद्युत वाहीनी जवळील मोठया झाडांमुळे दुर्घटना होवू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने झाडांची छाटणी करण्यात यावी. नागरीकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेवढया रूग्णवाहिका तैनात ठेवावी. पोलिस विभागाने पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टमद्वारे चक्रीवादळाबाबत जनजागृती करावी. तसेच आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करावा आणि नागरीकांना स्थलांतरीत करताना सहकार्य करावे. १०. कोविडची स्थिती लक्षात घेता सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता, निर्जंतुकीकरण, रुग्णालयाचा विद्युत पुरवठा, मनुष्यबळ, औषध पुरवठा, स्थानिक कार्यकारी यंत्रणा NDRF आणि SDRF पथके तैनात करतांना मास्क, पीपीई किट्स ची उपलब्धता, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. 

तसेच येथील व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन पुरवठा अखंडीत सुरू राहील याबाबतची दक्षता घ्यावी. तसंच सर्व महापालिका आयुक्तांनी सखल भागातील ठिकाणांची संख्या आणि स्थलांतरीत नागरिकांची माहिती कार्यालयाकडे सादर करावी. तसंच सर्व यंत्रणानी त्यांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४x७ सुरु ठेवावे आणि जिल्हा नियंत्रण कक्षाच्या कायम संपर्कात राहून प्रत्येक घटनांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षास दयावी असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील अधिकारी वर्गाला दिले आहेत.

तसेच ठाणे शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार  होर्डिंग्जची सुरळीत तपासणीचे काम सुरू आहे.  शहरात ठिकठिकाणी उभे करण्यात आलेले होर्डिंग चक्री वादळामुळे पडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत आहेत का याची तपासणी तात्काळ सुरु करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या