येत्या आठवडाभरात सफाई पूर्ण न केल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकणार

 विरोधी पक्षनेत्यांनी केली नालेसफाईची पोलखोल 

 पुरामध्ये ठाणेकरांचे जीव घ्यायचे आहेत का?- शानू पठाण

ठाणे -  ठाणे शहरातील नालेसफाईत पालिकेचे गोलमाल असून अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळच गाळ साचलेला आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात पाणी भरण्याचीच शक्यता अधिक आहे. मागील वर्षी नालेसफाईअभावी पूरस्थिती निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे काही ठिकाणी नागरिकांना जीव गमवावे लागत आहेत. पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगर पालिका दरवर्षी 70 टक्के नाले सफाई करते. ते कामही शंभर टक्के पूर्ण होत नाही. मात्र, यंदा पालिका प्रशासनापुढे कोरोनाचे संकट असताना आणि एप्रिलच्या अखेरीस नालेसफाईला सुरुवात झाली असताना नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा ठरला आहे.  नालेसफाई केवळ कागदावर दाखविली जात आहे.

 मागील वर्षी आलेल्या पुरात संभाजी नगरमधील एक तरुणी वाहून गेली होती. त्या नाल्यात मेट्रोच्या ठेकेदाराने पिलर उभा केला आहे. त्या ठेकेदारावर कारवाईसाठी ठामपाने काय केले आहे? आधीची कोरोनाने लोकांचे जीव जात असताना आता पूरामध्ये लोकांचे जीव घेण्याचा प्रयत्न ठामपा प्रशासन आणि ठेकेदारांनी सुरु केले आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात नालेसफाई पूर्ण केली नाही तर मुख्यालयसमोर गाळ आणून टाकू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  पालिकेच्या अधिकार्‍यांचा ठेकेदारांवर अंकुश नसल्यामुळेच ही नालेसफाई रखडली असल्याने या अधिकार्‍यांच्या दालनात कचरा टाकण्याचा  इशारा त्यांनी दिला. तर, संभाजी नगर येथील नाल्यात एमएमआरडीएने चक्क पिलर उभा केल्याचे यावेळी निदर्शनास आले. ही बाब  गंभीर असूनही पालिकेच्या अधिकार्‍यांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप करीत पठाण यांनी नाराजी व्यक्त केली.

  ठामपाचे बांधकाम अभियंते रवींद्र शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक तडमवार आदी अधिकार्‍यांच्यासह ठाणे शहरातील मुख्य आठ नाल्यांच्या सफाईची पाहणी केली.  यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा विरोधी पक्षनेत्यांसमोर मांडल्या.  हे सर्व नाले ठाणे शहरात पूरस्थिती निर्माण करण्यास पूरक असतात. मात्र, या नाल्यांपैकी एकाही नाल्याची परिपूर्ण सफाई झाली नसल्याचेच या पाहणी दौर्‍यामध्ये दिसून आले. नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग,  ठाणे शहर युवक अध्यक्ष विक्रांत खामकर, संदीप जाधव आदी उपस्थित होते.  किसननगर भटवाडी, हनुमान नगर, सावरकर नगर नाका, इंदिरानगर जंक्शन, कोरम मॉल, आंबेेडकर रोड, राबोडी, आकागंगा नाला या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी त्यांनी केली.

जर कचरा तसाच नाल्यांमधून असेल तर त्या पूर्ण सफाईचा अर्थ काय घ्यायचा? ठाणे महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच झाली आहे. जर नालेसफाई झाली असेल तर कचरा टाकला कुठे, कधी आणि केव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र हे प्रश्न उपस्थित करूनही पालिका प्रशासन त्याचे उत्तर देऊ शकत नाही. आताची परिस्थिती पाहता, 10 टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झालेली नाही. मे महिन्याची सहा तारीख ओलांडत आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे, असे असतानाही नालेसफाई होत नसेल तर याची जबाबदारी कोणाची? त्याच त्याच ठेकेदारांना ठेके देऊन प्रशासन आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांची टक्केवारी ठरलेली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA