ऑनलाईनद्वारे नोंदणी ; एकाच वेळी ग्रूप बूकिंग ; चौकशीची मागणी

ठाणे महापालिकेने झोपडपट्टीतील काही केंद्रे वगळता संपूर्ण केंद्रांची ऑनलाईनद्वारे नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही दिवसांपासून अवघ्या काही सेकंदातच स्लॉट बूक होत आहेत. या प्रकारात हॅकींगचा संशय व्यक्त करणारे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यातून एकाच वेळी ग्रूप बूकिंग होत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेने पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करावी. तसंच एकाच वेळी ग्रूप बुकिंग करणारे आयपी अॅड्रेस, फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्हेगारांना गजाआड करावे. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी,  या प्रकरणी सायबर पोलिसांकडून चौकशी करावी. तसेच संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

या कारवाईत महापालिका प्रशासनाने सामान्यांचे हित ध्यानात घ्यावे,  कोविन अॅपद्वारे ठाण्यातील लसीकरण केंद्रे बुक करण्याची लिंक काही ठराविक व्यक्तींकडे आधी असल्याचा संशय आहे. त्यामुळे ते ठराविक कोण आहेत, त्याचा उलगडा पोलिसांकडूनच होऊ शकेल, तसंच दुसऱ्या डोससाठीही ऑनलाईन स्लॉटद्वारे बूकिंग करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. ठाण्यात दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असलेले हजारो नागरीक आहेत. त्यातील बहुतांशी ज्येष्ठ नागरीक तंत्रस्नेही नाहीत. त्यातच ठाण्यातील केंद्रांवर मुंबई, नवी मुंबई, पनवेलमधील नागरिकांची गर्दी होती. अशा परिस्थितीत ठाण्यातील ज्येष्ठ नागरीक दुसरा डोस मिळेल का नाही, याबद्दल हवालदील आहेत, याकडे मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.

 कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच कडक निर्बंध जारी करण्यात आले असले, तरी ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलबाहेर लसीकरणासाठी शनिवारी गर्दीचा महापूर उसळला. विशेषत: ऑनलाईन नोंदणी असतानाही दुपारच्या सत्रातील नागरिकांनाही चक्क १२.३० च्या सुमारास प्रवेश दिल्यामुळे गर्दी झाली होती. या प्रकाराकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत ऑनलाईनद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी एक हजार नागरिकांना नोंदणी दिली होती. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ग्लोबल हॉस्पिटलच्या परिसरात गर्दी उसळली होती.

 बाळकूम ते साकेत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्यामुळे केवळ एका मार्गिकेतच फुटपाथवर रांग, रस्त्यालगत नागरीक आणि पोलिसांची वाहने आणि काही वेळा होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे गोंधळ उडाला होता,  ग्लोबल हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी सकाळी ९ ते १ दरम्यानच्या चार तासासाठी प्रत्येकी एक तासाचा टप्पा निश्चित केला आहे. तर दुपारच्या सत्रासाठी दुपारी २ ते सायंकाळी ६ दरम्यान प्रत्येकी तासाभराच्या टप्प्यानुसार नोंदणी दिली गेली. मात्र, हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्याने सरसकट नागरिकांना प्रवेश दिला. त्यानंतर हॉस्पिटलमधील नोंदणीवेळीही नागरिकांकडील मोबाईल वा एसएमएसनुसार वेळेची तपासणी केली गेली नाही.  त्यामुळे रांगेत उभे राहिलेले दुपारच्या सत्रातील शेकडो नागरीक सकाळच्या सत्रातच प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारात गर्दी उसळली होती. इतरवेळी अवघ्या तासाभरात होणाऱ्या लसीकरणाला तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दुपारी दीडच्या सुमारास सातव्या मजल्यावर १०० हून अधीक नागरीक एकत्र आले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला, अशी तक्रार नारायण पवार यांनी केली आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA