उपसरपंचाच्या शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने हजारो कोळंबी मासे मृत


शहापूर तालुक्यातील मौजे वेहलोंढे येथे राहणारे शेतकरी तथा वेहलोंढे ग्रामपंचायत उपसरपंच जितेश विशे यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर सामुहिक शेततळे योजनेअंतर्गत शेततळे बांधले असून मागील बारा वर्षांपासून त्या शेततळ्यात जितेश विशे हे मत्स्यव्यवसाय करीत आहे. त्या शेततळ्यात १४ ऑक्टोबर २०२० रोजी ५१ हजार रुपये किंमतीचे कोळंबी या मत्स्य जातीचे दहा हजार बीज सोडले होते.  मात्र  शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने हजारो कोळंबी जातीचे मासे मृत पावले असून वासिंद पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी ४ मे रोजी सकाळी सहा वाजता उपसरपंचाचे वडील जगन्नाथ विशे नेहमीप्रमाणे शेततळ्यावर गेले असता शेततळ्याच्या किनारी सर्व कोळंबी जातीचे मासे मृत अवस्थेत दिसून आले. हे कळताच जितेश विशे शेततळ्यावर जाऊन पाहिले असता शेततळ्यातील कोळंबी मासे मृत अवस्थेत पाण्याच्या किनारी दिसून आले. आणि शेततळ्यातील पाण्याला देखील उग्र वास येत होता. तेव्हा विशे यांनी पोलीस पाटील रोशनी वेखंडे व इतर लोकांना बोलावून दाखवले त्यांना देखील पाण्याचा उग्र वास येत होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेततळ्यात विषारी औषध  मिसळून कोलंबी जातीच्या माशांचे नुकसान केले आहे. सदर प्रकरणी अज्ञात इसमावर शेततळ्यात विषारी औषध  मिसळून ५१ हजार रुपये किंमतीचे दहा हजार कोळंबी जातीचे मत्स्य बीज सध्याची एकूण किंमत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याने  वासिंद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० अधिनियम कलम २८४ व ४२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप कदम करीत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या