वादळामध्ये झाडं उन्मळून पडण्यामागे मानव निर्मित समस्याच जबाबदार


 अलिकडेच आलेले तौक्ते वादळाचा ठाण्यालाही चांगलाच फटका बसला. ठाण्यामध्ये तौक्ते वादळाच्या तडाख्यात सुमारे पावणे दोनशेहून अधिक झाडं पडली तर ५० हून अधिक झाडांच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक ठिकाणी यामुळे मोठे नुकसान झाले. वृक्षांच्या फांद्या या रिक्षा तसंच इतर वाहनांवर पडल्यामुळे त्यांचे नुकसान झालेच तर काही ठिकाणी झाडं पडल्यामुळे जिवितहानीही झाली. ठाण्यामध्ये तर एक मोठा वृक्ष उन्मळून एका गाडीवर पडल्यामुळे एक डॉक्टर यामध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी बराच काळ लागला. मोठमोठी झाडं पडल्यामुळं होणारं नुकसान तर मोठं आहेच मात्र ही झाडं उन्मळून पडण्यामागे जेवढं वादळ जबाबदार आहे तेवढ्याच मानव निर्मित समस्याही जबाबदार आहेत. वाढत्या शहरी करणासाठी या ना त्या कारणाने झाडांचा बळी दिला जात आहे. यावर पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवल्याने आता वृक्षांना कमकुवत करून पाडण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप अनेक पर्यावरण प्रेमींनी केला आहे. याबाबत लवकरच ठाणे पालिका आयुक्तांना पत्र पाठवून वास्तव परिस्थिती सांगण्यात येणार असल्याचे पर्यावरण संस्थेचे अरुण गुंडे यांनी सांगितले.

ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण झालं आहे. याचा फटका या झाडांना अधिक बसला. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मोठमोठी झाडं होतं. अनेकदा रस्ता रूंदीकरणात ही झाडं रस्त्याच्या मध्ये आली त्याचप्रमाणे डांबरीकरण करताना झाडांच्या बुंध्यांना विशेष जागा ठेवण्यात आली नाही, त्यामुळं मूळं कमजोर होऊन ही झाडं पडली. तसंच अनेक ठिकाणी रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर झाडं लावली होती. या झाडांना संरक्षण मिळावं म्हणून जाळ्याही लावण्यात आल्या मात्र त्याची योग्य ती दखल न घेतल्याने झाडांचे बुंधे मोठे होऊन हे बुंधे या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकल्याचे प्रकार पहायला मिळाले. त्याचा फटकाही या वादळात बसला आणि कमजोर करण्यात आलेली झाडं उन्मळून पडली. खरंतर रस्ता रूंदीकरण करताना झाडांच्या भोवती मोठी जागा ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून झाडांचा बुंधा वाढायला मदत होते. मात्र याची दखल कुठेच घेतली गेली नाही. 

अनेक महत्वाच्या बाजारपेठांमध्ये रस्त्यांवर असलेल्या दुकानदारांनी दुकानासमोर असलेली झाडं या ना त्या कारणाने पडतील अशीच व्यवस्था अप्रत्यक्षपणे केली. झाड पडल्याने ती जागा आपोआप रिकामी होईल व त्याचा वापर करता येईल हेही एक कारण त्यामागे होते.  त्यामुळे त्याचा फटका या झाडांना बसला. खरंतर पाण्यासाठी झाडं लावणं आवश्यक असताना तोंडाने जरी वृक्षारोपण करण्याचा महिमा गायला जात असला तरी आपल्या घरासमोर आपल्या दारासमोर झाड नको या दृष्टीकोनातूनच पाहिलं जात असल्यामुळं अनेक महत्वाचे रस्ते उघडे-बोडखे झाले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोखले रोड, बाजारपेठ या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडं होती. मात्र ही झाडं काही वर्षात जमीनदोस्त झाली. पुन्हा तिथे कधीही झाडं न लावली गेल्यामुळे हे रस्तेही उघडे-बोडखे झाले आहेत. इतकंच नव्हे तर तलावपाळी परिसरातील मोठ मोठी वृक्षही मागील दोन-तीन वर्षात अशाच तऱ्हेने पडली आहेत. त्यामुळे तलावपाळी परिसरही आता भयाण वाटू लागला असल्याचे अनेक ठाणेकरांनी आपले मत व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA