ठाणे परिवहन सेवेची मुंब्रा ते मुंबई बस सेवा सुरु

  ठाणे -  मुंब्रा शहराचा झपाट्याने विकास होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. मुंब्र्यामधील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे शक्य होत नसल्यामुळे मुंब्रा ते मुंबई अशी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी वारंवार मुंब्र्यामधील रहिवाशांनाकडून वारंवार होत होती.   सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा ते भिवंडी तसेच मुंब्रा ते घोडबंदर या मार्गावर महापालिकेची बस सेवा सुरू झाली आहे. मुंब्रा शहर हे नेहमी गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाते, तसेच मध्य रेल्वे मधील वाढती गर्दी पाहता मुंब्र्यामधील नागरिक तसेच मुंबईत क्रॉफर्ड मार्केट (फुले मंडई) येथे जाणाऱ्या व्यापारी वर्गाची मागणी होती. 

मुंब्र्यावरून  कमी अंतरावर जाण्याकरिता खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने त्याचा खर्च सर्व सामान्यांना परवडत नाही. यामुळे मुंब्र्यावरून थेट मुंबई व कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता ठाणे परिवहन सेवेची मुंब्र्यावरून बस सेवा सुरु करण्यात यावी याबाबत खा. डॉ. श्रीकांत शिंदे, परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, बालाजी काकडे तसेच महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण प्रयत्नशील होते. अखेर परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी बस उपलब्ध झाल्याने सदर बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला त्वरित मान्यता दिली असून प्रायोगिक तत्वावर टी.एम.टी.ची वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा २ बस सेवा अक्षय्य तृतीया व रमजान ईद पासून सुरु होणार असल्याची माहिती खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

तसेच भिवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वातानुकुलीत बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी यावेळी सांगितले. आता मुंब्र्यामधील रहिवाशांना थेट मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर प्रवास करणे शक्य होणार आहे. अक्षय्य तृतीया व रमजान ईद निमित्त मुंब्रावासियांना अनोखी भेट मिळाल्याने मुंब्रावासियांनी ठाणे परिवहन सेवेचे मनापासून आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad