ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरची अग्नीसुरक्षा वार्‍यावर


ठाणे -  कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश ठाणे पालिकेच्या प्रशासनाने जुमानले असल्याचे उघडकीस आले आहे. ठामपाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या ग्लोबल कोविड सेंटरमधील अग्नीसुरक्षा बेभरवश्याची असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेली अग्नीसुरक्षा यंत्रणेची हाताळणी करण्याचे प्रशिक्षणच  अग्नीशमन दलाच्या जवानांना देण्यात आलेले नसल्याचे येथील कर्मचार्‍यांनीच सांगितले. यामुळे, डमी अग्नीसुरक्षा यंत्रणा उभी करुन प्रशासनाने धूळफेक केली असल्याचा आरोप  करण्यात येत आहे.

 राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटटना घडत आहेत. कौसा येथील घटनेत चार जण प्राणाला मुकले आहेत. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी फायर ऑडीट करण्याचे आदेश ठामपा प्रशासनाला दिले आहेत. असे असतानाही खासगी रुग्णालयांची अवस्था दयनिय असतानाच पालिका प्रशासनाचे स्वत:च्याच रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी स्वयंचलित अग्नीसुरक्षा लावण्यात आली असल्याचे उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉ. मालेकर हे सांगत आहेत. तर, या ठिकाणी तैनात करण्यात आलेले फायरमॅन सदरची यंत्रणा मानवचलित असल्याचे सांगत आहेत. ही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही अग्नीशमन दलाच्या जवानांना देण्यात आलेले नाही. 

या ठिकाणी जबाबदार अधिकार्‍याची नियुक्ती करणे गरजेचे असतानाही असा अधिकारीही या ठिकाणी तैनात नाही. विशेष म्हणजे, या ठिकाणी आग विझवण्यासाठी अवघ्या 500 लिटर पाण्याचा एक टँकर उभार करण्यात आलेला आहे. ही सर्व सामुग्री ‘मॉक ड्रील’ प्रमाणे असून डमी यंत्रणा उभारुन पालिका प्रशासनाने फसवणूक केली आहे. जी परिस्थिती ग्लोबलची आहे; तीन परिस्थिती कौसा आणि पार्किंग प्लाझा येथीलही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक करणार्‍या मुख्य अग्नीशमन अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

   ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी शानू पठाण यांनी ज्येष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विक्रम खामकर यांच्यासह  समीर नेटके, दिनेश बने, दिनेश सोनकांबळे, फिरोज पठाण, दिलीप उपाध्याय आदीनी. ग्लोबल रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीमध्ये जे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. तते फोनच स्वीकारले जात नसल्याचे निदर्शनास आले. तर, येथील अग्नीसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याचेही आपल्या निदर्शनास आले असल्याचे पठाण यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad