ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले कोविड रूग्णालयातील साहित्य लंपास


म्हाडाने उभारलेल्या कोविड रूग्णालयातील साहित्य ठामपाच्या आरोग्य अधिकार्यांनी केले लंपास
चोरीचा गुन्हा दाखल करणार- ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड

ठाणे

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालय उभारण्यात आले. या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावण्यात आले होते.  मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ.  मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे.  कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ना. डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. जर, हे साहित्य जसे होते त्या स्थितीत 48 तासात पुन्हा स्थानापन्न केले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. या प्रकारामुळे आव्हाड  प्रचंड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी  उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणार्या  डाॅ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे.  

ना. डाॅ.  आव्हाड यांनी सांगितले की,  कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता , त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे  विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला.  ठामपाचे आरोग्य अधिकारी डाॅ मुरूडकर यांनी रूग्णालयातील सुमारे 94 व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत  अशा बेजबाबदार अधिकार्यांला  तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या 48 तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही ना.डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्प्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे कळव्यात आणि मुंब्प्रातही म्हाडाने तीन महिन्यांपुर्वी ही रुग्णालये उभारली होती. म्हाडाच्याच जागेवर ती होती. त्यानुसार, कळंवा येथे ४०० आणि मुंब्रा येथे ४१० असे एकूण ८१० बेड या दोन्ही रुग्णालयांमध्ये होते. याची निगा देखभाल, या ठिकाणी लागणारे डॉक्टरांसकट इतर मनुष्यबळ महापालिकेने पुरविले होते, तसेच त्यांचा खर्चही महापालिका करीत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात म्हाडाने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा आणि मुंब्रा या मतदारसंघात उभारलेले कोविड सेंटर अवघ्या तीनच महिन्यांत बंद करण्याचा निर्णय डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. 

म्हाडाने येथे केवळ रुग्णालय उभारले. मात्र त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, जेवण, मेडिसिन, ऑक्सिजन आदींसह इतर पुरवठा ठाणे महापालिका आपल्या खर्चातून करीत असताना तीन महिन्यांनंतर या दोन्ही रुग्णालयांचे दोन कोटी ६६ लाखांचे भाडे म्हाडाने मागितल्याने हे कोविड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या महासभेत या रुग्णालयांच्या ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरविणे आणि हाउसकीपिंग पुरविणे असे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले होते. त्यावर चर्चा करताना एवढा सगळा खर्च महापालिका करीत असताना, आता पुन्हा म्हाडाने जे काही स्ट्रक्चरल उभे केले आहे, त्याचे भाडे मागितले आहे, ते का द्यावे, असा सवाल या वेळी माजी सभापती राम रेपाळे यांनी केला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या