जांभळीनाका येथील फळभाजी मार्केट मधिल व्यापार स्थलांतरित करण्याचा डाव कोणाच्या फायद्यासाठी


 जिजामाता फळ भाजी सेवा संघ व छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता संघ या तलावपाळी, जांभळी नाका, ठाणे येथील फळ भाजी मार्केट मधिल व्यवसाय तलावपाळी येथील रस्त्यावर स्थलांतर करण्यास सर्व व्यापाऱ्यांचा विरोध.

ठाणे महानगरपालिका प्रशासनाने दोन्ही मार्केटमधील व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याबाबत मार्केटचे पदाधिकारी अथवा व्यापारी यांचे बरोबर कसलीही चर्चा न करता तसेच स्थलांतर करण्यात येणाऱ्या तलाव पाळीच्या रस्त्यावर शेड, लाईट सारख्या कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून न देता ठामपाने घेतलेल्या या तुघलकी निर्णयाला सर्व व्यापाऱ्यांचा विरोध आहे. कोविड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी ठामपा प्रशासनाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यास व्यापारी तयार असताना त्याबाबतचे कोणतेही नियोजन करण्याचे सोडून ठामपा प्रशासन काहीतरी करीत असल्याचा देखावा तयार करून गर्दी होत असल्याच्या नावाखाली फक्त फळभाजी मार्केट मधिल व्यापार स्थलांतरित करण्याचा डाव कोणाच्या फायद्यासाठी करीत आहे असा संशय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नेताजी सुभाष पथ, जांभळी नाका, बाजारपेठ  (जुना स्टेशन रोड) येथील रस्त्यावर पोलिसांच्या व ठामपाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने बेकायदेशीरपणे भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनीच हटवून छत्रपती शिवाजी मैदानाच्या फुटपाथवर व भाजी मार्केटच्या आजु- बाजुच्या रस्त्यावर पोलिसांनीच बसविले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व त्या गर्दीचे खापर भाजी मार्केट वर फोडून दोन्ही मार्केट बंद करून स्थलांतरित करण्याचा डाव स्पष्टपणे दिसत आहे. अशाप्रकारे दोन्ही मार्केटमधील व्यावसायिकांचे स्थलांतर केल्यावर याच मार्केट परिसरात दुसऱ्या भाजी विक्रेत्यांना आणून बसवायचे व त्यांना भाजी विक्री करण्यासाठी अर्थपूर्णरित्या मदत करायची हा पोलिस प्रशासनाचा दुटप्पीपणा आम्ही मागच्या वर्षी पाहिलेला व अनुभवलेला आहे, तसाच प्रकार पुन्हा सुरू असल्याचे स्पष्ट मत येथील व्यापाऱ्यांनी प्रजासत्ताक जनताच्या प्रतिनिधीशी  बोलतांना व्यक्त केले. 

मागच्या वर्षी देखील ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अशाच प्रकारचा निर्णय घेऊन मार्केट मधिल फळभाजी विक्रेत्यांना स्थलांतरित केले होते, त्यावेळी आम्ही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मार्केट मधिल सर्व व्यापाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य केले होते. त्यावेळी ठामपाने फळभाजी विक्रेत्यांना सेन्ट्रल मैदानात एक दिवस, तलाव पाळीच्या रस्त्यावर दोन दिवस ,भगवती शाळेचे मैदान नौपाडा, कॅडबरी नाका, घोडबंदर रोड व मुंब्रा रेतीबंदर येथे भाजी विक्रेत्यांना बसवून त्यांची फरफट चालविली होती. त्यावेळी त्या त्या ठिकाणचे पोलिस प्रशासन व स्थानिक गुंडांनी सदर ठिकाणी व्यवसाय करणे मुश्किल करून टाकले होते, त्यावेळी ठामपा प्रशासनाने व्यापाऱ्यांचा अडचणी सोडविण्यासाठी काहीही न करता व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. अशाप्रकारचा ठामपा प्रशासनाचा मागच्या वर्षी खूप वाईट अनुभव घेतलेला आहे म्हणून दोन्ही मार्केटमधील फळभाजी विक्रेत्यांचा व्यापार स्थलांतरित करण्यास ठाम विरोध आहे. असे स्पष्ट मत जिजामाता फळभाजी सेवा संघ सेक्रेटरी तसेच ठाणे शहर (जि.) कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष दिगंबर ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या