Trending

6/recent/ticker-posts

राज्य शासन व्यापक उपाय योजना राबवित आहे - मंत्री एकनाथ शिंदे


मुंबई

कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासन व्यापक उपाय योजना राबवित आहे. सद्य परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता  सर्वांकडून कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदा सज्ज असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची बैठक बोलावली. सोमवारी अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील महापालिका आणि नगर परिषदांची बैठक तर मंगळवारी कोकण, नागपूर व पुणे विभागाची बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. मंत्री  शिंदे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

 कोरोनावर मात करण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना आखून त्यांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे करण्यात यावी. कोरोनावरील उपाययोजनांसाठी तातडीची बाब म्हणून नगरविकास विभागातून निधी सोबतच सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल. कोरोना रुग्णालये, विलगीकरण केंद्रे यांची क्षमता वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. कोरोना विलगिकरण केंद्रांमधील सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात यावा. विलगिकरण केंद्रांमध्ये फायर ऑडिट करण्यात यावे. महिला रुग्णांच्या सुरक्षतेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी.  होम क्वारंटाईन रुग्णांवर विशेष लक्ष ठेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावी. कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कोरोना उपाययोजना करताना अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे लसीकरण पूर्ण करून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. आपण सर्व एकत्रितपणे कोरोना विरोधातील हे युध्द जिंकू असा आत्मविश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आरोग्य केंद्रांना स्वतः भेट देऊन व दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील कोरोना उपायोजनांबाबत सातत्याने आढावा घेत आहे. रुग्णवाहिका, बेड्स, ऑक्सिजन, लसीकरण, व रेमडेसिवीर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत अथवा पौष्टिक आहार पुरविण्या संबंधित कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद धिकाऱ्यांना दिली आहे. लवकरच ठाण्यात महापालिकेमार्फत तीन नव्या कोव्हीड रुग्णालयांच्या माध्यमातून २५०० बेड्स रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.


कोविड 19 चा प्रादुर्भाव मागील महिनाभरापासून मोठ्याप्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली कोविड सेंटर व खाजगी रुग्णालये देखील अपुरी पडत आहे, या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील 25 बेडपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करणेसाठी तातडीने मान्यता द्यावी तसेच आवश्यकता असल्यास महापालिकेच्या ताब्यातील रिक्त इमारती व वास्तू तात्पुरत्या स्वरुपात कोविड रुग्णालय सुरू करणेसाठी नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे लेखी स्वरुपात केली आहे. सद्यस्थ‍ितीतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाण्यातील 25 बेडपेक्षा जास्त क्षमता असलेल्या खाजगी रुग्णालय देखील कोविड सेंटर अत्यंत गरजेचे झाले आहेत, या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नामांकित रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन इतर आवश्यक बाबींची पूर्तता करतील अशा रुग्णालयांना तातडीने परवानगी द्यावी असे महापौर यांनी नमूद केले आहे. तर काही रुग्णालयांना कोविड रुगणालय सुरू करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास महापालिकेच्या ताब्यातील रिक्त इमारती व वास्तूंची जागा तात्पुरत्या स्वरुपात नाममात्र दरात उपलब्ध करुन  देण्याबाबत महापौरांनी प्रशासनास सूचित केले आहे. खाजगी रुग्णांलयामध्ये कोरोना रुग्णालये सुरू झाल्यावर जास्त बेड उपलब्ध होवून कोरोनाबाधित रुगणांवर वेळेत उपचार करणे सोईचे होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments