Trending

6/recent/ticker-posts

रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका उभारणार ऑक्सीजन प्रकल्प


२० टन ऑक्सीजन क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे 

ऑक्सीजनचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ऑक्सीजन निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन ऑक्सीजन निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. औरंगाबादस्थित आयरॅाक्स टेक्नॅालॅाजिज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हे दोन प्लांट उभारण्यात येणार असून यामध्ये प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन (पीएसए) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड या शासकीय ठिकाणी असे प्लांट उभे केले आहेत.       या प्लांटमधून २४ तासात १७५ सिलेडंर्स ऑक्सीजन निर्माण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोविड रूग्णालयासाठी २० टन तर पार्किंग प्लाझा रूग्णलयासाठी १३ टन प्राणवायची आवश्यकता आहे. या दोन प्लांटमुळे या दोन्ही रूग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

      गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होय होत होती. ऑक्सीजनअभावी रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी पार्किंग प्लाझामधील रूग्णांना ठाणे कोविड रूग्णालयामध्ये स्थलांतंरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना ऑक्सीजनचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत स्वतःचे दोन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला.      ठाणे महानगरापलिकेच्या ठाणे कोविड रूग्णालय आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय या ठिकाणी हे दोन प्लांट उभे करण्यात येणार असून एका प्लांटमधून २४ तासामध्ये जवळपास १७५ सिलेंडर्स ऑक्सीजन तयार होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे दोन प्लांटमधून दिवसाला अंदाजे २० टन ऑक्सीजन निर्माण होणार आहे. 


 कोविडबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या सेंट्रल कोविड वॉर रुम्‍ गेल्या वर्षभरापासून 24 तास कार्यरत आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्येत मोठयाप्रमाणात वाढ होत असल्याने याचा ताण वॉररुमवर पडत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी सेंट्रल वॉर रुम मध्ये आवश्यकतेनुसार तात्काळ मनुष्यबळ वाढवावे असे आदेश आज झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले.   या बैठकीस उपायुक्त मुख्यालय मारुती खोडके, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगरअभियंता रविंद्र खडताळे, उपनगरअभियंता रामदास शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वॉर रुम कार्यकारी प्रमुख डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments