ठाणे शहरातील ऐतिहासिक सामुग्रीचा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार - आ.केळकर


 ब्रिटीश काळात देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. त्यावेळी प्रथमच धावलेले वाफेवरील रेल्वे इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात जतन करण्यात येत आहे. ठाणे स्थानकात रेल्वे इंजिन बसवण्यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. हा ऐतिहासिक ठेवा ठाणेकरांचाच असल्यामुळे ठाणे स्थानकाची वेगळी ओळख यानिमित्ताने भावी पिढीला होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. रेल्वे इंजिनानंतर ठाणे शहरातील आणखी काही सामुग्रीचा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बोरीबंदर ते ठाणे अशी आशिया खंडातील पहिली रेल्वे १६८ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्यावेळी ४०० प्रवाश्यांना घेऊन आलेल्या या रेल्वेला १ तास १५ मिनिटे लागली होती. कालांतराने हळूहळू ठाणे स्थानकाचा विस्तार होत गेला. सद्यस्थितीत ठाणे स्थानकात एकूण ११ फलाट असून मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे ऐतिहासीक ठाणे स्थानकाची ओळख पटवणारे हे वाफेवरील पुरातन इंजिन ठाणे स्थानकात विराजमान व्हावे अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवाशी संघादवारे करण्यात आली होती. तेव्हा उत्तरोत्तर विस्तारत असलेल्या ऐतिहासिक ठाणे शहरातील टाऊन हॉल,अशोक स्तंभ आदी विविध बाबींचे जतन करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संजय केळकर यांनी तात्काळ पुढाकार घेतला. 

तसेच ब्रिटीशकालीन रेल्वे इंजिन जतन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या प्रयत्नांना तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या कारकिर्दीत चालना मिळाली.आणि फेब्रुवारी २०२१ मध्येही रेल्वेमंत्र्याची भेट घेतल्यानंतर त्यांनीही सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार, हे रेल्वे इंजिन ठाणे स्थानक परिसरात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी जागेची निश्चिती करून अखेर,खडतर प्रयत्नानंतर ठाणेकरांचा हा प्राचीन ठेवा ठाणे स्थानकात जतन होत आहे. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA