Top Post Ad

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आज अधिकच गरजेची आहे – उत्तम जोगदंड


ठाणे 

विषमतेने आणि विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वांगाने विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही अशा मूल्यांचा सविधनात समावेश केला. ही मूल्ये समाजात रुजवण्याचे कार्य आता पर्यन्त कायद्याच्या, संविधानाच्या मदतीने चालू होते पण गेल्या ६ -७ वर्षात त्याला सुरुंग लागत असलेला आपण पहात आहोत. लोकशाही समाजवाद उतरंडीला लागून भांडवलशाही प्रबळ होते आहे. दुर्बळांना न्याय मिळेनासा झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता,अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची घसरण होते आहे. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही शिकवण आज अधिकच  उपयोगी ठरणार आहे आणि तिचा वापर करणं आज अतिशय गरजेचं आहे, असे उद्गार जेष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम जोगदंड यांनी काढले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सद्यस्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. झूम वर झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले.

भारतीयांची अस्मिता जागृत करणारे आंबेडकर सर्व समाजाचे प्रतिंनिधी होते असे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुप्रसिद्ध लेखक आणि अनुवादक अमरनाथ सिंग म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून ते म्हणाले, आंबेडकरांनी दलितांवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, त्यांची  अस्मिता जागृत केली आणि त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याबरोबर उभं केलं. पण तरीही त्यांना एका जातीत बंदिस्त करणं बरोबर नाही, ते फक्त दलितांचे नाहीत तर सर्व समाजाचे प्रतींनिधी होते. संविधानात समतेचे, लोकशाहीचे  मूल्य असूनही आजही समाजात विषमता नष्ट झाली नाही. जातीव्यवस्थेची जबरदस्त पकड समाजावर आहे. ती नष्ट झाल्याशिवाय सर्वांचा विकास होणे शक्य नाही. हा मूलभूत बादल होण्यासाठी कायद्याने वरुन प्रयत्न होत आले तरीही खालून लोकांकडून त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. या साठीच बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करा हा विचार आज महत्वाचा आहे.

अध्यक्षीय समारोपात जगदिश खैरालिया म्हणाले, बाबासाहेबांनी संविधानात अंगिकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून आज परत पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालला आहे. भांडवलशाही प्रबळ होत चालली आहे. पण याने निराश न होता शेतकरी आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन अशा सर्व अन्याय्य गोष्टींविरुद्ध लढले पाहिजे. सरकारवर वाचक ठेवण्यासाठी अभ्यास, मनन, लेखन  करून सत्याग्रही, लोकशाही समाजवादाचा विचार पुढे नेला पाहिजे.
या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर, प्रवीण खैरालिया यांनी आंबेडकरांच्या विचार आपल्या शब्दात मांडले. एकलव्य कार्यकर्ते आतेश शिंदे आणि ओंकार जंगम यांनी समतेचे गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अजय भोसले यांनी सांभाळली. फेसबूक वर लाईव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com