तब्बल २३ कोटींचा खर्च करून बनवलेले १०८५ बेड क्षमतेचे ‘व्होल्टास’ रुग्णालय तात्काळ सुरु करा


ठाणे  :
 ठाणे  शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्णांसाठी ऑक्सीजन मिळणो कठीण झाले आहे, रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आता व्होल्टास येथील कोवीड सेंटर उभारुन देखील ते सुरु करण्यात आलेले नाही. केवळ कर्मचाऱ्यांची भरती न करण्यात आल्याने हे सेंटर धुळखात पडल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची भरती करुन हे सेंटर तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

     ठाणे  शहरात आजच्या घडीला १ लाखाहून अधिक रुग्ण हे कोरोना बाधीत झालेले आहेत. त्यातील ८३ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या  रुग्णांची संख्या, १६ हजाराहून अधिक आहे. परंतु यातील अनेक रुग्ण हे ऑक्सीजन किंवा आयसीयुत उपचारासाठी दाखल आहेत. परंतु सध्या ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे, तसेच रेमडेसिवरचा देखील पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार होतांना दिसत नाहीत. त्यात आता रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असतांना मागील कित्येक महिन्यापासून व्होल्टास कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेले १ हजार बेडचे कोवीड सेंटर अद्यापही सुरु करण्यात आलेले नाही, हे अतिशय गंभीर बाब आहे.

 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, हे रुग्णालय तत्काळ सुरु करण्यात यावे, तेथे योग्य त्या प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा, जेणे करुन आता बेड मिळविण्यासाठी जी काही रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरु आहे, ती कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही, उलट केवळ ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने व्होल्टास कोवीड सेंटर सुरु करण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रखडल्याने हे रुग्णालय सुरु झाले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर येथे कर्मचाऱ्यांची भरतीच करायची नव्हती तर २३ कोटींचा खर्च करुन हे रुग्णालय उभारलेच कशासाठी असा प्रश्न मला पडला आहे. त्यापेक्षा तेच २३ कोटी रेमडेसिवर किंवा वाढीव ऑक्सीजनचा साठा उपलब्ध करुन घेण्यासाठी खर्च केले असते, तर त्याचा तरी किमान उपयोग झाला असता असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड कमी करण्यासाठी हे रुग्णालय तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी या पत्राद्यावरे केली आहे.  


ठाणे महापालिकेने कोविड रुग्णांसाठी उभारलेले ‘ग्लोबल इम्पॅक्ट हब’, ‘भूमिपुत्र रुग्णालय’ ही रुग्णालये रुग्णांअभावी रिकामी आहेत व बुश कंपनीच्या जागेवरील रुग्णालयामध्ये उद्घाटनानंतर केवळ तीन रुग्ण आहेत. ठाण्यातील एका ‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी महापालिका प्रशासनाने ‘व्होल्टास’ कंपनीच्या जागेवरील १०८५ बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची घाई सुरू केली.  तब्बल २३ कोटी रुपयांच्या रुग्णालयासाठी कंत्राटदाराला महापालिकेने घाईघाईने कार्यादेश दिल्याने भाजप गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला होता.  
 १०८५ बेड क्षमतेचे ‘व्होल्टास’ रुग्णालयाच्या उभारणीकरिता तब्बल २३ कोटींच्या कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश म्हणजे केवळ निधी लाटण्याचा उद्योग कोणाकरिता करण्यात आला अशा सवालही ठाणेकरांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad