आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा; महापालिका प्रशासनावरअंकूश ठेवण्यात सत्ताधारी अपयशी


 ठाणे 

शहरात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. तर त्यांच्यावर अंकूश ठेवण्यात सत्ताधारी अपयशी ठरत आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. रुग्णालयात बेड संपले, रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांची धावपळ, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, मृत्यूसंख्येबाबत लपवालपवी अशा बिकट परिस्थितीत बॉडीबॅगही संपल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली.   कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सहकार्याचा हात पुढे केला होता. पार्किंग प्लाझा रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यानंतरच्या घटनेनंतर गांभीर्याने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पार्किंग प्लाझात ऑक्सिजनपाठोपाठ पाणी संपल्याचा प्रकारही उघडकीस आला. त्यानंतर ग्लोबल कोविड रुग्णालयात बॉडीबॅग संपल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सध्याची परिस्थिती हाताळण्यात ठाणे महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. 

महापालिका यंत्रणेला रुग्णांबाबत गांभीर्य राहिलेले नाही. तर त्यांच्यावर अंकूश ठेवण्यास सत्ताधारीही अपयशी ठरले आहेत, अशी टीका डावखरे यांनी केली आहे. ठाणे शहरातील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णाला बेड मिळत नाही, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी धावपळ करावी लागते, ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांच्या जीवावर टांगती तलवार आहे. त्यातच मृत्यूसंख्येबाबत लपवालपवी सुरू असल्याचेही प्रसारमाध्यमांतून उघड होत आहे. बॉडीबॅग संपल्यामुळे कचऱ्याच्या पिशवीत मृतदेह बांधल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. बॉडीबॅगचा साठा ठेवण्याचे गांभीर्यही रुग्णालय प्रशासनाला नाही. त्यामुळे ठाण्यातील परिस्थिती बिकट असून आरोग्य आणीबाणीसारखी आहे. त्यावर उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन हतबल झाले आहे अशी टीका आमदार डावखरे यांनी केली. काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आलेली १६ रेमडेसीविर इंजेक्शन कोविड हॉस्पिटलमधील असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रशासनाने चौकशी करून सत्यता जाहीर करावी अशी मागणीही आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. 

जिल्हास्तरावर रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणा-यांवर प्रतिबंध होण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यानुसार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कोविड रूग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास कोविड रूग्णालय आस्थापनेस जबाबदार धरण्यात येईल. तसंच रूग्णालय प्रशासनानं इंजेक्शनच्या मागणीचे प्रसिक्रिप्शन रूग्ण अथवा रूग्णांच्या नातेवाईकांकडे न देता इंजेक्शनची मागणी स्टॉकीस्टकडे करायची आहे. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी २५३० १७४० तसंच १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या