Top Post Ad

हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याचा प्रकार धक्कादायक !


कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण काहीसे निर्धास्त झालो. मात्र, दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकट निर्माण झाले. त्यातच पार्किंग प्लाझातील परिस्थितीमुळे हॉस्पिटलची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र निर्माण झाले. शहरात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात सत्ताधारी आणि महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे. 

ठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा येथे उभारलेल्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याचा प्रकार धक्कादायक होता. अशा प्रकारांमुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. सध्या ठाण्यातील रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. . व्हेंटिलेटर, रेमडेसिविर किंवा ऑक्सिजन अभावी रुग्णाचा जीव जाऊ शकतो, याचे भान ठेवावे. त्याचबरोबर कोविड आपत्तीत `टाळूवरील लोणी’ खाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हेंटिलेटर खरेदी लाच प्रकरणातून उघडकीस आले. त्यामुळे सत्ताधारी आणि महापालिकेने सतर्कता बाळगावी असे आवाहन डावखरे यांनी केले आहे. कोविड आपत्तीत लोकसहभागाबरोबरच सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि मदत घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यातून संशयित रुग्णांची टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन वेगाने होण्याबरोबरच कोरोना साखळी मोडण्यास मदत होऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला दूर करता येईल, असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीतॲाक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने पार्किंग प्लाझा कोविड रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे पार्किंग प्लाझामधील रुग्णांना अचानक स्थलांतरित येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली होती त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने हा खुलासा करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री पार्किंग प्लाझामधील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन अभावी गैरसोय होवू नये तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना ठाणे कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. तरी रूग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जावू नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

           कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह ग्लोबल कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता यावे यासाठी विवियाना मॉलजवळील पार्किंग प्लाझा इमारतीमध्ये अद्ययावत सर्वसेवासुविधांसह 690 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात 640 बेड हे ऑक्स‍िजनसुविधा असलेले तर 40 बेड व्हेंटीलेटरयुक्त आहेत.  सद्यस्थितीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता सदर कोविड सेंटर कायमस्वरुपी सुरू ठेवावे अशी लेखी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केली आहे. या ठिकाणी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी आवश्यकतेनुसार तातडीने नियुक्त करण्यात यावे जेणेकरुन रुग्णांना तातडीने उपचार मिळतील असेही महापौर यांनी पत्रात नमूद केले आहे.           पार्किंग प्लाझा हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ठाणे पूर्व व इतर भागातील कोरोनाबाधित रुग्णांना सोईचे ठरणार आहेत. तर भविष्यात देखील रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेता हे कोविड सेंटर कायमस्वरुपी रुग्णालय म्हणून सुरू ठेवावे अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केली आहे.  आज कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी ठाणे महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र याकामी नागरिकांचे सहकार्य देखील तेवढेच अपेक्षित आहे. असे आवाहन महापौरांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com