जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने दिली १५ कोटी रुपयांची देणगी


 नवी दिल्ली :
 मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद अधिवेशनात उमटले आहे. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. आज काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत मोहन डेलकर यांची आत्महत्या आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.  काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, मात्र हे जिलेटिन कुठून आले आणि कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न केतकरांनी राज्यसभेत उपस्थित केला.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचे आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली आहे.


या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्त सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राला आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून निर्माण केल्या जात असलेल्या दबावाला सरकारने बळी पडू नये अशी सूचना केली आहे. गेल्या सहा वर्षापासून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून देशात विरोधी पक्षाची सरकारे अस्थिर करणायाचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा वापर करून राज्याच्या अख्त्यारितील प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव टाकला जात आहे. विनोद राय आणि सत्यपाल सिंह यांची उदाहरणे देशासमोर आहेतच. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

एका गंभीर प्रकरणात आरोपाची सुई ज्याच्यावर आहे अशा पोलीस अधिका-याने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबद्दल टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, या देशामध्ये प्रशासकीय अधिका-यांनी राजकीय नेतृत्वाला पत्र लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ आहे का? गुजरातचे माजी डीआयजी डी. जी. वंजारा यांनी पत्र लिहून गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री व देशाचे विद्यमान गृहमंत्री यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून अमित शाह हे पोलीस दलाचा गैरवापर करून दुस-यांसाठी खड्डे खोदत आहेत. असे म्हटले होते त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का? पुढे निवृत्त झाल्यावरही वंजारा यांना गुजरात सरकारने सेवेत घेतले.  याचा अर्थ वंजारा यांनी केलेले आरोप सत्य मानायचे का? अशाच त-हेचे पत्र लिहून गुजरातचे पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्त्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मोदी यांनी राजीनामा दिला होता का? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.

सदर पत्राचे विश्लेषण करताना सावंत म्हणाले की, हे पत्र लिहिणा-या व्यक्तीची मानसिक स्थिती व परिस्थिती तसेच पत्रातील मसुदा यावर पत्र लिहिणा-याने मांडलेले मुद्दे तर्कसंगत आहेत की तर्कशून्य हा विचार करावा लागेल. सदर व्यक्तीवरती राज्य सरकारने बदलीची कारवाई केली आहे. तसेच या व्यक्तीच्या अत्यंत जवळचा अधिकारी एका गंभीर प्रकरणात NIA च्या कोठडीत असून त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. या आरोपांची सुई सदर पत्र लिहिणा-या अधिका-याकडेही आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणाच्या दबावाच्या हे पत्र लिहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सदर पत्रातील मजकूरामधील बार मधून पैसे गोळा करण्याचा आरोप या अगोदरच भाजपा नेत्यांनी कसा केला? यातील साधर्म्य योगायोगाचा भाग कसा? वर्षभरातून मुंबईतील हॉटेल कोरोनामुळे बंद आहेत. सचिन वाझे यांनी गृहमंत्र्यांशी बोलणे केले असा जो आरोप केला जात आहे. खरे तर वर्षभरापूर्वीच अशा त-हेचे बोलणे झाले असते. अँटिलियाची घटना झाल्यानंतर किमान बुद्धीचा व्यक्तीही अशी चर्चा करणार नाही. फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझे गृहमंत्र्यांना भेटले या आरोपाबाबत आश्चर्य व्यक्त करताना गृहमंत्री कोरोना ग्रस्त असताना नागपूरच्या रूग्णालयात ही भेट कशी होऊ शकली असती? सचिन वाझे याने पोलीस आयुक्तांना भेटून फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या गृहमंत्र्यांशी झालेल्या भेटीची माहिती दिली असे मानले तर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही? ते त्यांचे कर्तव्य नव्हते का? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.


दरम्यान  भाजपचे नेते एकमेकांना  “आपले साहेब आता मुख्यमंत्री होणार, काहीच काळजी करू नका' अशा प्रकारचे संदेश देत असल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.  स्फोटक  प्रकरणांवरून केंद्रातील सरकार हस्तक्षेप करून सरकार बरखास्त करू शकते अशा स्वरूपाची  अटकळ भाजप नेते बांधत असून दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेले पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते नरेंद्र पाटील  यांनी देखील खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन, त्यांना आपले साहेब मुख्यमंत्री होणार आहेत आता काहीच  काळजी करू नका अशा स्वरुपाचे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे..  भले सर्वसामान्यांच्या अतिशय मुलभूत समस्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाला नसेल मात्र  सुशांत सिंह राजपूत, नंतर कंगना राणावत, त्यानंतर धनंजय मुंडे प्रकरण,  पूजा चव्हाण, संजय राठोड प्रकरण, त्यानंतर अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांचे प्रकरणी मात्र राज्यात एक आक्रमक विरोधी पक्ष आहे असे दाखवून दिले आहे. अंबानी, वाजे, सिंग, देशमुख प्रकरणावरून भाजपनेते  सरकारवर तुटून पडले आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार काहीशी बॅकफूटवर गेली असल्याचे चित्र दिसत आहे.  त्यामुळे आपला आक्रमकपणा अधिक दाखवून मिडीयाच्या माध्यमातून  महाविकास आघाडीचे नेते हतबल कसे होतील याचा प्रयत्न सध्या भाजपकडून जोरदार सुरू आहे. त्याला यश येत असल्याचे दिसताच भाजपचे नेते एकमेकांना  सूचक संदेश देऊ लागले आहेत. भाजपच्या अंतर्गत घडामोडीतून देवेंद्र फडणवीस आता येत्या काही दिवसात पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा स्वरूपाची चर्चा प्रसिद्धीमाध्यमाद्वारे रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad