जग में बुद्ध का नाम है.... यही भारत की शान है


भारतीय समाजाच्या उत्थानाचा प्रश्न हा सेवेचा किंवा साधुतुल्य आदर्शाचा नसून तो मूलतः शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक आहे. विशेषतः हिंदू धर्माच्या नावानेे प्रतिष्ठित-प्रचलित झालेल्या अंधश्रद्धा व्यक्तीच्या व समाजाच्या हानीस कारणीभूत असून त्या नष्ट करणे अगत्याचे आहे. मानवविरोधी, विज्ञानविरोधी कर्मकांडात बहुजन कष्टकर्‍यांना गुंतवून ठेवणारा धर्म हा ‘धर्म’ नसून ‘अधर्म’ आहे असे मला वाटू लागले.  पुढे ही नकारात्मक भूमिका मला अपूरी वाटू लागली. महात्मा जोतिबा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दीक्षित केलेला बुद्ध धम्म यात कालमानाप्रमाणे शब्दरचनेत व शैलीत बदल असले तरी आशयाच्या दृष्टीने त्यातली साम्यस्थळे मला भावली. समाज असो की व्यक्ती, त्याचे तत्त्वज्ञान कोणते, त्याचा धर्म कोणता हे महत्त्वाचे वाटू लागले. माणूस किती जगतो यापेक्षा तो कसा जगतो यावरच त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता आणि समाजाचे कल्याण अवलंबून आहे. त्यासाठी मानवाला आणि समाजाला एखाद्या नैतिक अधिष्ठानाची नितांत गरज असते. अगदी नास्तिक माणसाला देखील त्याचे इतरांशी ‘रिश्ते नाते’ कोणते, मानवी प्रतिष्ठेसाठी त्याने कसे जगावे याचा विचार करावा लागतो. बाबासाहेबांच्या चिंतनातून बुद्ध धम्माचे सुंदर फूल कसे उगवले याबाबत विचार करू लागलो तसतशी माझी खात्री होत गेली की मानवी इहवादी कल्याणासाठी, अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी बुद्ध धम्माला शरण जाणे, बुद्ध धम्म अनुसरणे अपरिहार्य आहे.  

जगाने दोन महायुद्धे पाहिली. जसा भौतिक विकासाचा चमत्कार पाहिला तसे धर्म व वंशाच्या नावाने वावरणार्‍या शक्ती किती विनाशकारी सिद्ध होऊ शकतात हेही आपण पाहिले. विज्ञान व तांत्रिक क्रांतीचा वेग वाढला तरी माणूस सुखी-स्वस्थ का नाही? या प्रश्नाचा शोध नव्याने होऊ लागला. विज्ञानवादी निष्ठांशी प्रतारणा न करता धर्मचिकित्सा होऊ लागली. सर्व जगातले विचारवंत धर्माबाबत पुनर्विचार करू लागले. आपण परंपरागत सांप्रदायिक धर्माचे अंधानुकरण करायचे की स्वतःला व मानवजातीला हितकर ठरणार्‍या धर्मतत्त्वांचा शोध घेऊन त्याचा स्वीकार करावयाचा, याबाबत संपूर्ण जगभर चळवळ सुरू झाली. 

धर्मश्रद्धांची काही बुद्धिवाद्यांनी हेटाळणी केलेली असली तरी मनुष्याची मनोदशा आणि गतिमानता ही बर्‍याच अंशी धर्मश्रद्धांवर आधारलेली असते. "समाजाची धारणा करणारा तो धर्म" ही व्याख्या आता तोकडी पडते. गोठ्यात गुरांची धारणा होते. चारा मिळतो. पाणी मिळते. परंतु स्वातंत्र्याची घोर उपेक्षा होते. तसेच काही धर्मात उच्चवर्णीयवर्गीयांचे हितसंबंध जोपासले जातात. ते लोक ईश्वर आणि प्रचलित धर्म व समाजव्यवस्थेचे गोडवे गातात. धर्म हा ईश्वरनिर्मित असतो, सनातन असतो, त्यात बदल करणे पाप आहे अशी ढोंगी शिकवण देतात. गरीब, भोळ्या, कष्टकरी समाजाच्या धर्मशीलतेचा गैरफायदा घेण्यासाठी आज पुन्हा अंधश्रद्धांना उजाळा देण्याचे, देवधर्माच्या नावाने दोन किंवा अनेक धर्मसमुहांमध्ये कलह माजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचे परिणाम लक्षात आल्यामुळे मानवी स्वातंत्र्य व सुखाचा विचार सर्व जगात आता नव्याने मूळ धरू लागला आहे. धर्माच्या अथवा अन्य कोठल्याही कारणांसाठी मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होता कामा नये, हा विचार आता सर्वच देशात मान्यता पावत आहे.

 भारतीय संदर्भात फुले-आंबेडकरी चळवळीने मानवी स्वातंत्र्याचा विचार सत्यशोधक पद्धतीने केला. ‘स्त्री-शूद्र-अतिशूद्र’ या नावाने धर्म व समाजव्यवस्थेत रसातळाला गेलेल्या बहुजन समाजाच्या मनात धार्मिक विद्रोहाची भावना जागविताना या महापुरुषांनी धर्मचिकित्सा केली. हजारो वर्षांच्या सपशेल खोट्या धर्म कल्पना, ईश्वर, पुरोहित, पंड्यांची गुलामगिरी झुगारून नव्या मानवी व मानवतावादी धर्माच्या तत्त्वांचा शोध घेतला. राजकीय स्वातंत्र्य चळवळीत सत्तांतराचा विचार प्रमुख होता. भारतीय मानसिकतेचा त्यात विचार नव्हता. राजकीय स्वातंत्र्य मिळताच सर्व काही ठीक होईल, अशी नेत्यांची कल्पना होती. परंतु तसे झाले नाही. स्वराज्यप्राप्तीनंतर आज लोकशाहीला धर्माचे, हिंदू राष्ट्र स्थापण्याचे आव्हान मिळत आहे. त्यामागे चुकीच्या धर्मकल्पना, दुसर्‍या मानवी समुदायाबद्दल द्वेष याशिवाय काय आहे? जगात चुकीच्या धर्मकल्पनांमुळे तथाकथित धर्मयुद्धं झाली व त्यांचे परिणाम लाखो लोकांच्या कत्तलीमध्ये झाल्याचे आपण पाहिले. म्हणून खरी मानवी व जनवादी धर्मतत्त्वे शोधण्याचा आणि त्यांचा स्वीकार करण्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरलेला आहे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मचिंतन केवळ विद्रोही नाही. त्याला सामाजिक व सृजनात्मक आयाम आहे. नव्या भारताच्या निर्मितीचा त्यामध्ये ध्यास आहे. ते करताना त्यांनी भारतीय परंपरेतले सर्व चांगले विचार स्वीकारले. गौतम बुद्धाच्या सकस धर्मचिंतनात त्यांना मानवाच्या स्वातंत्र्याचा कल्याणकारी विचार दिसला. त्यामुळेच सर्व जगाचा धम्म होण्याचे सामर्थ्य असणार्‍या बुद्ध धम्माचा स्वीकार त्यांनी केला आणि त्याची दीक्षा भारतीयांना दिली. हे युगप्रवर्तक कार्य करून बाबासाहेबांनी केवळ धम्माचे पुनरूज्जीवनच केले नाही, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आणि मानवाच्या मांगल्याचा विचार दिला. नव्या जगाची उभारणी बौद्ध तत्वज्ञानाला अनुसरून झाली नाही तर विनाश अटळ आहे, हा इशाराही त्यात गर्भित आहे. डॉ. बाबासाहेबांनी भारताला जागे केले. या देशातला माणूस मुक्त केला. अस्पृश्यता आणि ब्रह्मवर्गाच्या गुलामगिरीतून दलित, शोषित व पीडितांना स्वतंत्र केले. दीक्षादिन आपण मुक्तिदिन म्हणून साजरा करतो. त्याचे रहस्य यात आहे. 

 स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवर नव्या भारताची उभारणी व्हायची नसेल तर विकासाची सारी फळे प्रस्थापितांना मिळणार, हा धोका आता नव्याने निर्माण झालेला आहे. आर्थिक दृष्टीने देखील बुद्ध धम्माची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मानवाविषयी, त्याच्या अस्तित्त्व व स्वातंत्र्याविषयी आस्था नसणारे नेते हिटलरी वळण घेतात आणि लोकांना नव्या गुलामगिरीत बळजबरीने ओढतात. नव्या तंत्रज्ञानाचा, नव्या विकासाचा कसा कुणासाठी उपयोग करावयाचा, याचे सुगम उत्तर बुद्ध धम्मात सापडते. समस्त मानवाच्या उत्थानाची एक विश्वव्यापी चळवळ म्हणून बुद्ध धम्माचा स्वीकार जगात होत आहे. आंतरिक मानवी आशा-आकांक्षांचा भौतिक जगाशी समन्वय साधून व्यक्ती आणि समुहजीवनाला एक मंगलमय आशय देण्याची क्षमता बुद्ध धम्मात आहे. सर एडविन अरनोल्ड या थोर विचारवंताने बुद्ध धम्माची "Light of Asia" म्हणून नोंद घेतलेली आहे. 

 आता यापुढे परिस्थितीचे केवळ बौद्धिक आकलन पुरेसे नसून जाणीवपूर्वक जगावयाचे असेल तर माझी जीवनमूल्ये कोणती या प्रश्नाचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात ठाम भूमिका घ्यावी लागेल. माझ्या जीवनमूल्यांची कसोटी सांप्रदायिक धर्म किंवा परंपरा नसून माझा विवेक आणि माझी इमानदारी असायला हवी. माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक-राजकीय हालचालींच्या प्रेरणा माझ्या जीवनमूल्यांच्या द्योतक असल्या पाहिजेत. माझ्या वाणीत आणि कृतीत माझी जीवनमूल्ये प्रतिबिंबित व्हायला हवीत. माझ्या स्वातंत्र्याचा व सुखाचा पाठपुरावा करण्याचा मला अधिकार असावा, परंतु इतरांच्या सुख-स्वातंत्र्याचे अपहरण माझ्याकडून होणार नाही अशी हमी मी इतरांना दिली पाहिजे. माझी समाजात कुचंबणा होऊ नये, माझ्या अभिव्यक्तीला, विकासाला बंधने नसावी परंतु त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ आणि प्रगतीसाठी मी बांधील बनण्याची तयारी ठेवली पाहिजे. सामाजिक आणि व्यक्तिगत परिवर्तनाला बाधा पोचणार नाही असे स्वयंशासन मला स्वीकारणे जरूरीचे आहे.

 भौतिक शास्त्रांच्या माध्यमातून कित्येक सत्यांचे आकलन होत आहे. मानव शक्तिशाली झालेला आहे. परंतु जीवनमूल्यांच्या बाबतीत मानवाला आपल्या विवेकशक्तीवर आणि त्याला प्राप्त झालेल्या सांस्कृतिक वारशावर अवलंबून राहावे लागते. माणूस आणि समाज यांतील ‘रिश्ते नाते’ स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या पायावर प्रत्येेकाला निश्चित करता यावे हा सर्व मानवतावादी संतांचा हेतू असला तरी सर्वांनीच परंपरांचे ईश्वरवादी-दैववादी भोंगळ जोखड फेकून दिले नाही. परंतु त्यांच्या शिकवणुकीचा आशय विचारात घेता त्यांनी मानवांना समान लेखले. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मानवी समता व ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. 

 परंतु सर्व धर्मातील धर्ममार्तंडांनी वैज्ञानिकांप्रमाणे संतांचाही अनन्वित छळ केला. गौतम बुद्ध, चार्वाक, चोखोबा, तुकोबा यांच्या छळवादामागे चातुर्वर्ण्याची रोगट व्यवस्था व विचार आहे. बहुजन कष्टकर्‍यांना, स्त्रियांना, शूद्र-अतिशूद्रांना विद्येचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्याविरुद्ध या देशात जोतिराव फुल्यांना आणि डॉ. बाबासाहेबांना एक नवे क्रांतिकारी युगप्रवर्तक तत्त्वज्ञान मांडावे लागले. त्यात ब्राह्मणविरोध नाही. नव्या निरामय भारताच्या निर्मितीसाठी उचललेले ते क्रांतिकारी पाऊल होते. त्यात ऐतिहासिक अशा सत्याचा शोध होता. 19 व्या, 20 व्या शतकातही मानवाला उच्चनीचतेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करून ठेवलेले असताना त्याला आदर्शाचे तारे तोडावयास लावणे, समाजवादी तत्त्वज्ञानाचे मुखवटे घालून त्याच्या मानसिक कुचंबणेकडे दुर्लक्ष करणे, हे अज्ञानमूलक तरी होते अथवा भोंदूपणाचे तरी होते. म्हणून ‘याचि देही याचि डोळा’ अन्याय-अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी फुले-आंबेडकरी चळवळ निर्धाराने उभी राहिली. विद्येच्या मंदिराची दारे स्त्री, शूद्र, अतिशूद्रांसाठी उघडली गेली पाहिजेत, निसर्गदत्त पाण्यावर कुणाचीही आणि कोणत्याही धर्मियांची ठेकेदारी असता कामा नये, देवाची मंदिरे जातीच्या नावाने बंद असता कामा नयेत अशा मूलगामी मुद्यांवर या महापुरुषांनी सक्रीय संघर्ष उभा केला. ती केवळ बौद्धिक चिकित्सा नव्हती. तळागाळातल्या लोकांच्या दुःखाचे कारण त्यामागे होते. ते दुःख दूर करण्यासाठी लोकांनी जाणीवपूर्वक उभे राहावे हा त्यांच्या आंदोलनाचा हेतू होता. या मूलभूत लढ्यांना दक्षिण आफ्रिकेतील संघर्षाला किंवा दांडी यात्रेला मिळाली तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामागे उच्चवर्णीयांची संकुचित बुद्धी होती. शूद्र अतिशूद्र बहुजन समाज त्यावेळी अंगठेबहाद्दर होता. उच्चवर्णीयांनी लिहावे, त्यांनीच वाचावे, त्यांनीच नेतृत्त्व करावे. बौद्धिक आणि राजकीय नेतृत्वात डोळसपणे भाग घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला वाळीत टाकण्याचा किंवा इंग्रजधार्जिणा किंवा देशद्रोही म्हणून संबोधण्याचा तो काळ होता. परंतु उपेक्षा झाली म्हणून सत्य नष्ट होत नाही.

 आता फुले-आंबेडकरी चळवळीचे औचित्य बुद्धिवाद्यांना कळू लागले आहे. फुले-आंबेडकरांच्या चळवळीचे पर्यावसान बुद्ध धम्म चळवळीत होणे अपरिहार्य आहे. हिंदू धर्म वाईट आहे असे म्हणावयाचे परंतु प्रत्यक्षात दैनंदिन व कौटुंबिक जीवनात हिंदू चालीरितींचा अवलंब करावयाचा, रोटीबेटी व्यवहाराच्या बाबतीत आपलेच लोक म्हणजे जातवाले शोधायचे यामागे ढोंगबाजी आहे. ती सत्यशोधक चळवळीला विसंगत आहे.  मी गरजेपोटी किंवा काही फायदे मिळवावे किंवा समाजात वाहवा व्हावी या हेतूने बुद्ध धम्म स्वीकारला नाही. स्वातंत्र्य व समता ही मानवी जीवनाची पायाभूत तत्त्वे आहेत. स्वातंत्र्य मनुष्यजीवनाला गती देेते तर समता आपल्याबरोबर इतर मानवांचा विचार करावयास शिकवते. ‘शीलाच्या मार्गाने पुढे जा. तू सुखी होण्याचा मार्ग चोखाळावास. परंतु इतरांना दुःख देणारी कृती तर नव्हेच परंतु मनातून देखील इतरांंना दुःख होईल असा विचार करू नकोस,’ हे मला बौद्ध धम्माने शिकविले.

 अंध परंपरा, रूढी आणि अवडंबरात रूतलेल्या समाजाला विद्वतेची दारे उघडी होऊ दे. माझ्याप्रमाणेच ते देखील मुक्त, मोकळे, प्रकाशमान असावेत हा समतेचा विचार स्वातंत्र्याच्या ऊर्जेला अर्थ देतो. स्वातंत्र्य म्हणजे मोकाट सुटणे नव्हे. स्वातंत्र्याची प्राप्ती सर्व प्राणिमात्रांना मिळावी अशी बौद्ध धम्माची धारणा आहे. तो एखादा हुकूमनामा नव्हे अथवा तथाकथित परब्रह्माची माया नव्हे. सार्‍या मांगल्याची साठवण करून, पण अविद्या व मानवविरोधी आचार-विचार यांना तिलांजली देत पुढे जाण्याची प्रेरणा बौद्ध धम्मात आहे. ‘अत्त दीप भव’ चा महान संदेश बौद्ध धम्माने जगाला दिला. तो परंपरावादी सांप्रदायिक किंवा जातीवादी, वर्णवादी, वंशवादी धर्म नव्हे. समस्त मानवजातीचा समत्त्व भावनेने विचार करणारा तो सार्वत्रिक धर्म आहे. आजच्या विज्ञानयुगाशी अत्यंत सुसंवादी असा हा धम्म मानवांना कल्याणकारी आहे.

 अशा धम्माचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपल्या आचार-विचारांची दिशा ठरविताना मार्गात बहिष्काराचे काटे आले. गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न झाले. माझ्या कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आले. परंतु यत्किंचितही डगमगायचे नाही असा मी निर्धार केला होता. माझ्या मताचा कोणी स्वीकार करावा असा माझा आग्रह नाही. माझ्या कुटुंबियांवर देखील मी माझी मते लादली नाहीत.तथापि धम्माची शिकवण व आचार विचार इतका स्वयंंसिद्ध आहे की माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाबाळांना धम्माची महती पटायला वेळ लागला नाही. अविद्या, विषमतावादी रूढी आणि अवडंबरांना त्यागून सामाजिक अभिसरणासाठी माझी पत्नी, माझी मुलं माझ्यासोबत चालू लागली, याचे मला समाधान आहे.

 विवाहासंदर्भात शोध घेताना माझ्याप्रमाणे माझ्या चिमुकल्या मुलीच्या लक्षात आले की गुणांनी, विद्यांनी आणि कर्तृत्त्वाने संपन्न असलेल्या कित्येक सुयोेग्य वधू-वरांच्या मार्गात जातीधर्माचे पहाड कुणीतरी उभे करून ठेवले आहेत. मानवा-मानवात भेद निर्माण करणार्‍या लोकांचा धर्म खोटा आहे. ‘मानवप्राण्यांत जातीभेद नाही’ हे फुल्यांचे वचन किती साधे पण सत्यवादी आहे! ते पटायला विद्वता नको, प्रामाणिकपणा हवा. म्हणून ‘मानवी समता-स्वातंत्र्याच्या पायाभूत तत्त्वाशी इमान राखूनच मी जीवन साथीदाराची निवड करीन’ असे माझ्या मुलीने ठरविले. समजून उमजून स्नेहाची ज्योती उजळून तिने निर्णय घेतला. याची मला खात्री झाली तेव्हा संतोष वाटला. जे मोठेपणाच्या नावावर केवळ बुद्धिभेद करतात, कलह माजवतात, आपल्या अहंकारपूर्तीसाठी आपला वर्ण आणि वंश वरिष्ठ असल्याचे सिद्ध करण्याची केविलवाणी कसरत करतात, त्या अहंमन्य विद्वानांपेक्षा माझी ही मुलगी आणि तिचा जीवनसाथी कितीतरी शहाणे आहेत, अशी माझी खात्री झाली.

 परंतु ही पार्श्वभूमी ज्यांना माहीत नाही त्यांनी माझ्याविरुद्ध नाना गैरसमज पसरविले. त्यांनी मला बहिष्काराची पत्रे पाठविली. ते असे का करीत आहेत हे त्यांना कळत नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध काही भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. आमचा मार्ग सत्य आणि मंगलकारी आहे. तो त्यांना एक दिवस पटेल अशी आमची खात्री आहे. म्हणून जे सहकार्य करतील त्यांच्यासह व जे विरोध करतील त्यांच्याविना कुठलीही खळखळ न करता चालत राहण्याचा, वाचाळ होण्यापेक्षा कणभर कृतीसाठी धडपडत राहण्याचा मी निर्धार केलेला आहे. त्यात मी काही विशेष करतो आहे, असा माझा दावा नाही. अभिनिवेशापेक्षा आंतरिक प्रामाणिकपणाने एकेक पाऊल पडावे एवढीच इच्छा आहे. मला बहिष्काराची फिकीर नाही, तशीच शाबासकीचीही अभिलाषा नाही. याचा अर्थ असा नव्हे की, मी समाजाचे ऋण विसरतो आहे. वस्तुतः चंद्रपूर शहर, बल्लारपूर आणि समस्त चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य लोकांनी मला माझ्या राजकीय, सामाजिक कार्यात खूप सहकार्य दिले, खूप प्रेम दिले. माझ्या कुणबी समाजात माझी मुळे खोलवर रुजलेली आहेत. मी या जिल्ह्यातील असंख्य मित्रांचा, सेवादल साथींचा, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विशेषतः समतावादी कार्यकर्त्यांचा ऋणी आहे आणि राहीन. परंतु त्याचबरोबर माझ्या पूर्वाश्रमीच्या जीवनातील वाटाड्या म्हणून ज्यांचे अनुभव-अभंग मी नेहमी वाचले, त्या तुकोबारायांचे वचनही मला तितकेच महत्त्वाचे व प्रेरणादायी वाटते.

सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता...
म्हणून जाणीवपूर्वक मी धम्माचा स्वीकार केलेला आहे. यापुढे धम्ममार्गाने माझे पाऊल पुढेच पडेल. मागे हटणार नाही...

ॲड. एकनाथराव साळवे, चंद्रपूर (महाराष्ट्र)

 ‘‘पडघम : सांस्कृतिक निष्ठांतराचे’’ या पुस्तकातील अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचा नितांतसुंदर लेख...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1