मतदार संघातील विकास निधी कापून स्वत:च्या नावाची पार्लामेंटची नवी इमारत !

अंबरनाथ

मतदार संघातील विकास निधी कापून स्वत:च्या नावाची पार्लामेंटची नवी इमारत बांधत आहेत. याचे आम्हाला वाईट वाटतं, अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  मोदी सरकार असंवेदनशील असून कोविडचे कारण देत प्रत्येक खासदाराचा अडीच वर्षांचा निधी या सरकारने कापला. आणि या निधीचा वापर संसद भवन उभारण्यासाठी केला. मतदार संघातील विकास महत्वाचा की, आठशे हजार कोटींची वास्तू अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. अंबरनाथच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. महाविकास अघाडीचे काम अत्यंत चांगले सुरु असून त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.  संघटनेच्या पडत्या काळात बरोबर राहिले त्यांचाच मानसन्मान केला जाईल, असं स्पष्ट करत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्याच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असलेल्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी गर्भित इशारा दिला आहे. अंबरनाथ येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता बैठकीत सुप्रिया सुळे, मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते .

कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत विचारलं असता सुप्रीया सुळे यांनी प्रशासन याचं उत्तर देईल असं सांगितलं. तर मेळाव्याबाबत बोलतांना मोजक्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करत हा मेळावा घेत असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी मेळाव्याला परवानगी नाकारली, तर मेळावे रद्द केले जातील, असं उत्तर त्यांनी दिलं. तर लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीचे राज्य सरकार अभ्यासपूर्ण निर्णय घेणार असून प्रशासनाचा निर्णय हा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचा असाच राहिल. त्यामुळे त्यात कोणीही राजकारण करू नये असं स्पष्ट केलं. तर महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या किंवा नाहीत, याबाबत कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील, असं खासदार सुळे यांनी सांगितलं.

"भाजपमधून आलेल्यांनाच फक्त पक्षात प्रवेश द्या, ताटातून वाटीत आणि वाटीतून ताटात असं करू नका. अघाडीधर्म पाळत आपल्या मित्र पक्षातील उमेदवार घेऊ नका, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. ईडीची नोटीस आणि पावसातील सभा यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आल्याची कबुलीही सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. येणाऱ्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन या दोन्ही शहरांत करण्यात आलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या