नवी मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण

नवी मुंबई :
 नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये सत्तांतर करण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला असून भाजपाने सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र नवी मुंबईत भाजपला लागलेली गळती चिंताजनक होत आहे. सुमारे १४ माजी नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत.  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे पुढील काळात फोडाफोडीचे सत्र सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  यामुळे आता भाजप कोणत्या पक्षात फूट पाडणार याविषयी सर्वांना उत्सूकता लागली आहे. सर्वाधिक फूट भाजपमध्ये पडणार की महाविकास आघाडी याविषयीही चर्चा सुरु झाली आहे.

 महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच आ. गणेश नाईक यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत एकहाती वर्चस्व असलेल्या झोपडपट्टी परिसरावरील पकड ढिली झाली आहे. शहरी विकसित परिसरामध्येही पक्षाला गळती लागली आहे. ज्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला त्यांनीही आता भाजप सोडली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व ताकदीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षात सुरु झालेली गळती थांबविण्यासाठी आता आ. गणेश नाईक हेही आक्रमक झाले आहेत.

 शुक्रवारी नेरुळ येथे प्रीती चंद्रशेखर भोपी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आ. मंदा म्हात्रे, माजी महापौर जयवंत सुतार, संजीव नाईक,के.एन. म्हात्रे, धनाजी ठाकूर, निरंत पाटील, गिरीश म्हात्रे उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी विरोधकांवर टीका केली. तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार नगरसेवक फोडू, तुम्ही चार फोडले तर आम्ही आठ फोडू व तुम्ही ८ फोडले तर आम्ही १६ फोडू असा इशारा दिला आहे. मी एकदा ठरवले की, ते करतोच. असेही नाईक यांनी स्पष्ट केले. फोडा - फोडीच्या राजकारणावर नाईक पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलल्यामुळे पुढील काळात अजून फोडाफोडी होणार असे बोलले जात आहे.

दरम्यान ठाणे जिल्हाचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचे कट्टर समर्थक असणारे माजी नगरसेवक नविन गवते यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडवर नाईकांची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अडचणीच्या काळात असताना गणेश नाईक यांनी साथ सोडली होती, तसेच आता नाईक अडचणीत असताना नवीन गवते यांनी त्यांची साथ सोडली आहे. गवते यांनी गणेश नाईक यांना गद्दारी कशी खुपते हे दाखवून दिले असल्याची टीका महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिघा येथील हिंदमाता विद्यालयाच्या प्रागंणात राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार संघटनाचे अध्यक्ष किशोर आंग्रे व दिघा तालुका महिला अध्यक्ष गौरी आंग्रे यांनी हळदीकुंकू व अन्य एका समारंभात आव्हाड बोलत होते. या वेळी समाजसेविका रुतू आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष अशोक गावडे आदी उपस्थित होते. 

दिघा येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली तेव्हा नवीन गवते व संदीप नाईक यांनी रहिवाशांकडे पाठ फिरवली होती. तर आमदार विद्या चव्हाण व रुतू आव्हाड या दिघ्यातील रहिवाशांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. अनधिकृत इमारतीमध्ये नविन गवते यांच्या नावावरच चाळीस इमारती असून त्यामधून त्यांनी पैसे कमावले, पण येथील रहिवाशांना बेघर केले, असा आरोप आव्हाड केला आहे. नवीन गवते हा माझा कार्यकर्ता असून त्याला राजकारणातील बाळकडू मी दिले आहे. दिघातील इमारती वाचवण्यासाठी माझ्याकडे आला होता. पण वेळप्रसंगी त्याने सेनेत प्रवेश केला. माझ्यातला प्रामाणिकपणा घेऊ शकला नाही, अशी खंत यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केली 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA