Top Post Ad

'शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे'

 'शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे' असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा यांनी व्यक्त केले आहे.  त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शाह यांनी समर्थन दिले आहे. त्यांची एक मुलाखत सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाउनवर नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'कोविड दरम्यान दोन ते चार तासांचा कालावधी देऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ते न्याय्य होते की नाही हे माहित नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. पण शाहीन बागचे आंदोलन पांगवणे आवश्यक होते. ही एक चांगली खेळी होती आणि यात सरकारला यश आले. आता बर्ड फ्लू पसरला आहे. माझ्या मते, शेतक-यांचे आंदोलन पांगवण्यासाठी सरकार आता हा मुद्दा अमंलात आणेल.'

सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले, 'आमच्या चित्रपटसृष्टीतील मोठमोठे दिग्गज मौन धारण करुन बसले आहेत. कारण त्यांना भीती वाटते की जर त्यांनी काही मत व्यक्त केले, तर ते खूप काही गमावू शकतात. अहो, पण या लोकांनी एवढा अमाप पैसा कमावला आहे की, त्यांच्या पुढील सात पिढ्या बसून खाऊ शकतात. तर तुम्ही किती गमवाल?,' असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला आहे.

नसीरुद्दीन पुढे म्हणतात, 'जेव्हा सगळे उध्वस्त झाले असेल तेव्हा तुमच्या शत्रुंचाही आवाज येणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांची शांतता पण जास्त त्रास देईल. मला काही फरक पडत नाही. असे बोलूनही चालणार नाही. जर शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. तर मला काही फरक पडत नाही असे बोलू शकता. परंतु मला खात्री आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढेल तीव्र होईल. आणि सामान्य जनताही यामध्ये सहभाग घेईल. शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे,' असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.

शाह यांनी देशाच्या सद्य वातावरणाबद्दल बोलताना म्हटले, 'जर आजच्या काळात आपण भारतीय ट्राफिक नियमांचे पालन करत नाही, असे म्हटले तर तुम्हाला एंटी नॅशनल ठरवले जाईल. जर आपण हिंदी चित्रपट आवडत नाही, असे म्हटले तर तुम्हाला देशद्रोही ठरवून पाकिस्तानात निघून जा, अशी धमकी दिली जाईल,' शाह पुढे म्हणाले की, 'यूपीमध्ये लव्ह जिहादचा तमाशा चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी हे शोधून काढले आहे, त्यांनाच या गोष्टीचा अर्थ काय आहे हे माहित नाही. दुसरे म्हणजे, कुणी एवढा मूर्ख नसावा की एकेदिवशी हिंदूपेक्षा मुस्लिमांची संख्या या देशात जास्त होईल, असे त्याला वाटत असावे. यासाठी मुस्लिमांना किती वेगाने मुले जन्माला घालावी लागतील? मला वाटते की या सर्व फसव्या गोष्टी आहेत. यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. हा जो लव्ह जिहादचा तमाशा मांडला आहे, तो फक्त हिंदू आणि मुस्लिमांमधील सामाजिक संवाद थांबविण्यासाठी केला गेला आहे. भेटीगाठीच बंद झाल्या तर लग्नाचा विषयच संपेल. हा प्रयत्न सुरु आहे,' असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान दुसरीकडे  शुक्रवारी निदर्शने करणा-या शेतकर्‍यांच्या एका गटाने पंजाबच्या पटियालामध्ये सुरु असलेले बॉबी देओल, विक्रांत मैसी आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर 'लव्ह हॉस्टेल'चे शूटिंग थांबवले.  ही घटना घडली तेव्हा कलाकार सेटवर हजर नव्हते. परंतु क्रू मेंबर्स सेटवर चित्रीकरणाची तयारी करत होते. शेतक-यांनी त्यांना काम थांबवून तिथून निघण्यास सांगितले. यानंतर सर्व क्रू मेंबर्स सेटवरील सामान घेऊन तिथून निघून गेले. पंजाब आणि हरियाणा येथे देओल कुटुंबीयांना चित्रीकरण करु देणार नाही, असा पवित्रा आंदोलन करणा-या शेतक-यांनी घेतला आहे.

या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये सामील असलेला बॉबी देओल हा भारतीय जनता पक्षाच्या निकटवर्तीय असलेल्या देओल कुटुंबातील आहे, असे या शेतक-यांच्या गटातील एका प्रतिनिधीने माध्यमांना सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "बॉबी देओलचा भाऊ सनी देओल हे भाजपा खासदार आहेत. आई हेमा मालिनी या भाजपा खासदार आणि आणि वडील धर्मेंद्र हे भाजपाचे माजी खासदार आहेत. शेतकरी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, मात्र देओल कुटुंबातील कुणीही शेतक-यांच्या या आंदोलनाविषयी काहीच बोलेले नाही. मात्र पॉपस्टार रिहानाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी सरकारच्या बाजुने मत मांडले. रिहानाची पोस्टवर हेमा मालिनी यांनी दिलेली प्रतिक्रिया ही शेतक-यांच्या विरोधातील आहे," असे या आंदोलन करणा-या शेतक-यांचे म्हणणे आहे.

हेमा मालिनी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "परदेशी सेलिब्रिटींना पाहून मी चकित झाले आहे, त्यांच्यासाठी आमचा देश भारत हे फक्त एक नाव आहे. जे त्यांनी ऐकले आहे, ते आमच्या अंतर्गत घडामोडी आणि धोरणांबद्दल वक्तव्य करत आहेत. ते काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीही हेमा मालिनी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच माहित नाही की त्यांना काय हवे आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय आहेत हे देखील त्यांना माहित नाही यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होत असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com