तिकिटविक्रीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत एका दिवसात २.०९ कोटी रुपयांची भर

मुंबई  लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी एकूण सात लाख १९ हजार ८४७ प्रवाशांची भर पडली.  मध्य रेल्वेवर दोन लाख ६७ हजार १३७ प्रवासी तिकिटांची आणि ४२ हजार ५८२ प्रवासी पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर दोन लाख ३२ हजार ५७८ तिकिटांची विक्री करण्यात आली. लॉकडाउन काळात पास संपलेल्या २२ हजार ७५६ प्रवाशांना मुदतवाढ देण्यात आली. मोबाइल अॅपच्या माध्यमाने मध्य रेल्वेवर तीन हजार ४८४ तिकिटे आणि ७९४ पास देण्यात आले. एटीव्हीएमच्या माध्यमाने एक लाख ६१ हार २७२ तिकिटांची विक्री करण्यात आली. सर्व प्रकारच्या तिकिीटविक्रीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत एका दिवसात २.०९ कोटी रुपयांची भर पडली. ही सोमवारी सायंकाळी ६ पर्यंतची स्थिती होती, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 विना मास्क प्रवास करणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण ५१२ प्रवाशांवर महापालिकेच्या मदतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये प्रतिव्यक्ती २०० रुपये या प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३९६ प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई करत एक लाख चार हजार २७८ रुपयांचा दंड वसूल केला. करोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम लोकलमधून रोज सुमारे ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. अनलॉक काळात अत्यावश्यक प्रवाशांना लोकलमुभा मिळाल्यानंतर रोजच्या प्रवासी संख्येने शुक्रवारी १९ लाखांचा आकडा गाठला होता. यामुळे सध्या प्रवासी संख्या २६ लाखांपर्यंत पोहोचली असा अंदाज तिकीट विक्रीतून बांधण्यात आला आहे. नोकरदार वगळून सामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील १२ हजार आणि पश्चिम रेल्वेवरील १० हजार ७५६ प्रवाशांनी पासची मुदत वाढवून घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या