कोपरी गाव बनतेय अनधिकृत बांधकामांची स्मार्ट सिटी


    • भुमिअभिलेख सर्व्हे नाही, ठाणे महापालिकेतून केवळ प्लान पास करून इमारत राहीली उभी
    • ओ.सी./सी.सी. नाही. खोटी कागदपत्रे दाखवून चढ्या भावाने फ्लॅटची विक्री.
    • स्थानिक नगरसेवक / लोकप्रतिनिधी यांचा अनधिकृत बांधकामांना पाठिंबा
    • ठाणे महापालिका नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

ठाणे - - कोपरीगावात सध्या अनधिकृत बांधकामे खुलेआम सुरु आहेत. याला लोकप्रतिनिधी आणि येथील ठाणे महापालिकेचा खुलेआम पाठिंबा आहे. एका इमारतीमागे 350 ते 400 रुपये स्क्वेअरफूट प्रमाणे दर ठरवण्यात आला असून संपुर्ण इमारतीची एकरकमी हप्ता हे अधिकारी  वसूल करत असल्याची चर्चा गावठाणात रंगली आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक नगरसेवकांनीही लवकरात लवकर वर्षभराच्या आत फटाफट आपली बांधकामे करून घ्या. पुढच्या वर्षी निवडणुका येत आहेत. तेव्हा एकही काम दिसले नाही पाहिजे. अधिकाऱ्यांचे काय असेल ते आम्ही सेटींग करून देऊ. अशी तंबी येथील भूमाफियांना दिली आहे. स्थानिक नगरसेवक पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे करून स्वतचा निवडणुक निधीही जमा करीत असल्याने येथील गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  या परिसरातील अनेक इमारतींच्या जागेचा भूमीअभिलेख सर्व्हे झालाच नाही. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून प्लान पास करून इमारती उभ्या रहात आहेत.  किमान आठ महिन्यात या सहा ते सात माळ्याच्या इमारती उभ्या रहात आहेत. या इमारती कायम धोकादायक ठरू शकतात.  या इमारती केव्हा पत्त्यासारख्या कोसळतील याचा नेम नाही. तरीही इथले लोकप्रतिनिधी आणि ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाना याबाबत विचारणा केली असता त्यावर चौकशी करतो अशी उत्तरे देत आहेत. मात्र चौकशी होईपर्यंत या इमारती उभ्या राहत आहेत. केवळ चौकशीचा फार्स करीत बांधकाम पुर्ण होण्यास सहाय्य करीत असल्याचे दिसून येते 

अनधिकृत बांधकामाचे शहर म्हणून नावाजलेल्या ठाण्यातील अनधिकृत बांधकाम पावलोपावली वाढतच चालले आहे. केवळ एक हातोडा मारायची तकलादू कारवाई करणाऱ्यां महापालिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावठाण परिसरात केवळ तीन मजली इमारतीला परवानगी असताना कोपरीगावात आज सहा ते सात मजली इमारत उभी राहिली आहे. याकडे ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष राहिले आहे.   ओ.सी./सी.सी. नाही. खोटी कागदपत्रे दाखवून चढ्या भावाने फ्लॅटची विक्री करत आहेत. स्टेशन जवळ आणि इतर सुविधाही असल्याने सर्वसामान्य नागरिक कोणतीही विचारपूस न करता येथे आकर्षित होत आहे. याचा फायदा बांधकाम व्यावसायिक उचलत आहेत.  

 आम्ही महापालिकेचा भरणा (हप्ता) अधिकाऱ्यांना दिला आहे. आता आमच्या इमारती कोणी तोडू शकणार नाही. असे स्पष्टपणे इथले भूमाफिया सांगत आहेत.त्यामुळे कोपरीगावात सध्या अनधिकृत बांधकामांचा हैदोस सुरु आहे. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर गावठाणाचे रुपांतर अनधिकृत नगरात होण्यास वेळ लागणार नाही. इमारत परिसराकरिता असणाऱ्या सोयीसुविधांचा प्रचंड अभाव, अपघात झाल्यास वाहन पोहोचण्यास देखील जागा नाही अशा परिस्थितीत या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र पालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे तर लोकप्रतिनिधी खुलेआम या अनधिकृत बांधकामांना समर्थन देत असल्याने आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या