Top Post Ad

मंत्रिमंडळाने शिफारस करूनही राज्यपाल नियुक्त सदस्य दिरंगाई

 

मुंबई:
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती रखडली आहे. मंत्रिमंडळाने नावांची शिफारस करूनही त्यास अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिलेली नाही. याबाबत राज्यपालांना सरकारकडून स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. मात्र, राज्यपालांकडून त्यावर कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. याबाबत पुढे काय करायचे यावर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांची चर्चा झाली आहे. राज्यपालांविरुद्ध आम्ही कोर्टात जाऊ शकतो का, याबाबत कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत. जर कोर्टात जाता येत असेल तर ते पाऊल आम्ही उचलणार आहोत, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नमूद केले. ही नियुक्ती न झाल्यास घटनात्मक पेच कसा निर्माण होऊ शकतो, हे पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण होणार आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या, पण अद्याप सदस्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसल्याने समित्यांवरची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे जे कामकाज सुरू आहे ते संविधानिक आहे की असंविधानिक हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे. या समित्या असंविधानिक असतील तर तातडीने रद्द कराव्या लागणार आहेत, असेही पटोले यांनी नमूद केले.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आणि हे पद पक्षात कुणाला द्यायचे हे श्रेष्ठी ठरवणार, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पटोले यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्याबाबतही पटोले यांनी स्पष्ट मत मांडले. मंत्र्यांवर जे आरोप झाले आहेत त्याची चौकशी सुरू आहे. त्या दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी ती बाब हाताळत आहेत. चौकशीत कुणी दोषी आढळलं तर निश्चितच कारवाई होईल, असा विश्वास आहे, असे पटोले यांनी नमूद केले.

दरम्यान गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना  नाना पटोले  म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्वीट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्वीट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, देवानंद पवार व राजन भोसले हे उपस्थित होते.

मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचे सरकार नसून ते मूठभर लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर आहेत. कच्च्या तेलाच्या आजच्या किंमती पाहता पेट्रोल ३५ रुपये तर डिझेल २५ रुपये लिटर असायला पाहिजे होते, पण पेट्रोलने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. यामुळे महागाई वाढली आहे. सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर या दरवाढीसंदर्भात हात वर केले असून पेट्रोल डिझेलच्या किमती आपल्या हातात नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताना पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनालाही त्यांनी हरताळ फासला आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी जनतेने भाजपाला सत्ता दिली का? याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यमवर्गीयांनाही जगणे कठीण झाले आहे. त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे, असे नमूद करतानाच मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com