भिवंडीत देखील क्लस्टर योजना राबविण्यात येणार- पालकमंत्री

ठाणे 
 भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू आणि 21जण जखमी झाले होते. त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाच्या  समिती सभागृहात पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिवंडीचे आमदार रईस शेख, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी भविष्यात जिलानी इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर भिवंडीत देखील क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच तीन महिन्यात प्रस्ताव  सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस राज्य शासनातर्फे ३ लाख तर केंद्र शासनातर्फे २ लाख अशी एकूण रु.5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप 38 मृतांच्या 16 वारसांना  करण्यात आले. तर 21 जखमींना 50  हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणे शहारत ज्या प्रमाणे धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे भिवंडीतील देखील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात नुकतेच घडलेल्या जिलानी इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भिवंडीत देखील क्लस्टर योजना युद्ध पातळीवर राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संर्दभात पालिका आयुक्तांना देखील सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे भविष्यातील भिवंडीतील धोकादायक इमारतींचा  क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास होईल, आणि अशा प्रकारे दुर्घटना टाळण्यास मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या तीन महिन्यात भिवंडी क्लस्टर बाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल असे आश्वासन आमदार रईस शेख यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रास्तविक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या