Top Post Ad

माझ्या वडिलांनी मला आपण फक्त मानवता धर्माचे आहोत अशीच शिकवण दिली

एका कार्यक्रमाला जात असताना अमर शेख यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. सातरस्ता येथील न्यू शिरीन टॉकीजच्या बाजूलाच शेखांच्या निवासस्थानीच त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलं. त्यांचं निवासस्थान म्हणजे दोन छोट्याशा खोल्या होत्या. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दादा चंदूभाई देशपांडे घेऊन गेले. त्यांचं अंत्यदर्शन घेत असतानाच दादा हमसाहमशी रडू लागले. मी दादांना सावरलं. काही काळ आम्ही दोघे अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था पाहण्याचं काम करत राहिलो होतो. या प्रसंगी या ठिकाणी घडलेली एक घटना इथे मुद्दाम नमूद करतो.

अमर शेख यांना मुलगा नव्हता. दोन्ही मुलीच. दोघीही मोठ्या धीराच्या. अमर शेखांचं शव ताब्यात घेण्यासाठी 'कॉरोनर' र्कोटाची परवानगी घ्यावी लागली. त्यावेळी मोठ्या मुलीने र्कोटाकडे मागणी केली. न्यायाधीशांनी त्या मुलीला नाव, धर्म याची विचारणा केली. तेव्हा त्या मुलीने धीरोदात्तपणे न्यायाधीशांना सांगितले की, "माझा धर्म 'Humanity' म्हणजेच मानवता!" न्यायाधीश म्हणाले, "अमर शेख मुसलमान होते ना?"  त्यावर त्या मुलीने उत्तर दिले, "ते मला माहीत नाही. कारण माझ्या वडिलांनी मला आपण फक्त मानवता धर्माचे आहोत अशीच शिकवण दिलेली आहे आणि माझ्या वडिलांचे शव स्वीकारताना ते मानवता धर्माचे म्हणून मी स्वीकारेन!"

अशा दुर्धर प्रसंगात सुद्धा वडिलांची शिकवण आचरणात आणणारी त्यांची कन्या आणि मानवता धर्माची शिकवण देणारे शाहीर अमर शेख या दोघांचीही नावे महाराष्ट्राच्या इतिहासात अमर झाली आहेत.

अमर शेखांचा दफनविधी 'मुस्लीम दफन भूमी' त करावा असं ठरलं. तेव्हा त्यांच्या मुलीनं याला कडवा विरोध केला. “आमचे वडील एका विशिष्ट धर्माचे नव्हते, म्हणून त्यांचा दफनविधी वरळी येथील 'कॉस्मॉपॉलिटन' स्मशानभूमीत केला जावा,” असा आग्रह त्या मुलीने केला. मग कम्युनिस्ट नेते गुलाबराव गणाचार्य, दादा आणि मी एका जीपमधून मुस्लिम दफनभूमीत गेलो आणि तिथे खोदल्या जाणाऱ्या कबरीचे काम स्थगित करायला लावले आणि वरळीच्या कॉस्मॉपॉलिटन स्मशानभूमीत कबरीसाठी जागा तयार करून घेतली.

अमर शेख गेले. त्यानंतर अनेक दिवस दादा आपल्या घरातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती जावी अशा भावनेसारखे दुःखीकष्टी दिसत. त्यांच्या बोलण्यात सतत अमर शेखांच्यासंबंधी आठवणी येत होत्या. नावाप्रमाणे 'अमर' झालेले अमर शेख जेवढे महान कलावंत, तेवढेच त्यांचे मोठेपण ओळखून त्यांना आपल्या हृदयात स्थान देणारे दादा कोंडकेही महान!

चंदूभाई देशपांडे ह्यांच्या ‘मी पाहिलेले दादा कोंडके’ ह्या पुस्तकातून.

संकलन – चैतन्य सावळे

----------------------
आमचा धर्म पूर्णपणे वैज्ञानिक आहे, आमचा धर्म म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ शिकवण देणारा विश्वगुरु इत्यादी गमजा मारणाऱ्यांना हा प्रसंग म्हणजे मोठी चपराक आहे. धर्म कितीही चांगला असला तरी कोण स्वतःला त्या धर्माच्या दावणीला कशाप्रकारे बांधून घेतो यावरच तो धर्म त्या व्यक्तीला मुक्त करणारा आहे की बेडी घालून बांधून ठेवणारा आहे ते अवलंबून असते. सोने मौल्यवान असले तरी त्याची सुरी करून शरीरावर चालवली तर ते सोने दुःखदायकच ठरणार.

जवळजवळ सगळीकडेच विविध जाती-धर्माच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. ज्यांचा कोणताच धर्म किंवा जात नाही त्यांच्यासाठी ‘कॉस्मॉपॉलिटन स्मशानभूमी’ असते हे मुंबईत राहणाऱ्या काही लोकांना सुद्धा माहित नाही, असे त्यांच्यातील काहींनी म्हटले आहे. तसे मला सुद्धा माहित नव्हते. जे जातीधर्मच मानत नाहीत, ज्यांना त्यांच्या जातीधर्माने बहिष्कृत केले म्हणून त्यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत, बेवारस मृतदेह अशा लोकांसाठी ‘कॉस्मॉपॉलिटन स्मशानभूमी’ असते. नाशिकमध्ये अशा स्मशानभूमीची गरज नसावी. कारण महानगरपालिकेची स्मशानभूमी ही सर्वांसाठी असावी अशी माझी समज आहे.

परंतु ‘मरणानंतर वैर संपते, अशी शिकवण देणाऱ्या धर्माचे लोक सुद्धा माणसाला त्याच्या मरणानंतर सुद्धा जात चिकटवतात आणि हयातीतील वैर सुरु ठेवतात. अर्थातच अशा लोकांपेक्षा जनावरे निश्चितच चांगली. उच्चनीचतेचे चटके सोसणारे लोक सुद्धा आपले जातीधर्म सोडत नाहीत; जातीधर्माच्या अस्मितांचे जोखड कायम आपल्या मानेवर घेऊनच जीवन जगतात. ज्यांच्या डोक्यात मेंदू नावाचा अवयव नसतो आणि मनगटात रग नसते असे स्वतःचा काहीच पराक्रम नसलेले लोकच अपघाताने मिळालेल्या जातीधर्माच्या रॉयल्टीची मिजास मिरवतांना दिसून येतात.  कोणत्याही धर्मातील असो, जात ही एक अंधश्रद्धा आहे, हा अविवेक आहे. जातीच्या कल्पना मनात बाळगणे हा मानवी मनाला लागलेला एक फास आहे. तो मानवाच्या मनाचा फास सुटावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे.

- प्रल्हाद मिस्त्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com