सद्यस्थितीत मौजे- खारीगाव ता. जि. ठाणे येथील शासकीय स.न. 52/10 या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सया पार्क लगत सुरू आहे. नागरिकांकडून तक्रारीनंतरही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.कळवा मार्केट साईकृपा सोसायटी च्या मागे खारींगाव सया अपार्टमेंटच्या मागे कळवा मार्केट निलेश को ऑप सोसायटीच्या मागे, खरीवाग विघ्नेश्वर पार्क च्या बाजूला जारीमरी मंदिराचं मागे आझदनागर, खारीगाव अमृतांगण सोसायटी फेस 2 समोर असे एक ना दोन अनेक बांधकामे कळवा-खारीगाव प्रभाग समितीच्या हद्दीत सुरु आहेत.
ठाणे -
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर 4 सप्टेंबर 2020 पासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या होत्या. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून ती यादी सोमवारपर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश दिले. सदरची यादी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी निष्काषणाची व्यापक मोहिम 4 किंवा 5 सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले होते. मात्र या सर्व आदेशाला उप-आयुक्त आणि सहा-आयुक्त यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे निदर्शनास येत आहे.
आयुक्तांच्या आदेशानंतर काही मोजक्या बांधकामांवर कारवाईचा तकलादू हातोडा उगारण्यात आला. मात्र त्यानंतर ठाण्यातील विशेष करून कळवा-खारीगाव तसेच कोपरीगाव हे परिसर बेकायदेशीर, अनधिकृत बांधकामांचे हॉट-स्पॉट झाल्याचे निदर्शनास येत आहे. सध्यस्थितीत कळवा-खारीगावात गल्लोगल्ली बांधकामे सुरु आहेत. अगदी सरकारी जागाही या भूमाफियांनी हस्तगत केल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत कोणतीही चौकशी नाही किंवा तक्रार नाही. तक्रारदारास अधिकारीवर्गच मॅनेज करीत असल्याची चर्चा आता होत आहे. भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासोबत अधिकारी वर्गाचे अर्थपूर्ण साटेलोटे झाले असून यापुढे बांधकामाची तक्रार देणाऱयाकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवणे, ऐकला नाही तर चिरीमिरी देऊन गप्प करणे हे आता अधिकारी वर्गाचे काम झाले आहे. त्यामुळे हे भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराला उद्धट भाषेत, जा तुला काय करायचे तर कर असे सुनावत आहेत.
ठाणे शहरात सध्या अनधिकृत बांधकामे खुलेआम सुरु आहेत. याला लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱयांचा अर्थपूर्ण पाठिंबा असून संपुर्ण इमारतीची एकरकमी हप्ता हे अधिकारी वसूल करत आहेत. आणि बांधकामाला परमिशन देत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. किमान आठ महिन्यात या इमारती उभ्या रहात आहेत. या इमारती कायम धोकादायक ठरू शकतात. या इमारती केव्हा पत्त्यासारख्या कोसळतील याचा नेम नाही. तरीही इथले लोकप्रतिनिधी आणि ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱयांना याबाबत विचारणा केली असता त्यावर चौकशी करतो अशी उत्तरे देत आहेत. आणि यांची चौकशी होईपर्यंत या इमारती उभ्या राहत आहेत. केवळ चौकशीचा फार्स करीत बांधकाम पुर्ण होण्यास सहाय्य करीत असल्याचे दिसून येते
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ठामपा अधिकाऱयांना प्रचंड हप्ते द्यावे लागत असल्याने ओ.सी./सी.सी. नसताना देखील खोटी कागदपत्रे दाखवून येथील भूमाफिया चढ्या भावाने फ्लॅटची विक्री करत आहेत. सर्वसामान्य नागरिक कोणतीही विचारपूस न करता येथे आकर्षित होत आहे. याचा फायदा बांधकाम व्यावसायिक उचलत आहेत.
0 टिप्पण्या