कवी यशवंत मनोहर यांचा गुरुवारी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने जीवनव्रती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार होता. परंतु कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारत असल्याचे लेखी कळवले. वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही, असे परखडपणे कळवून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समीक्षक यशवंत मनोहर यांनी गुरुवारी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे.
साहित्य संघाला पाठवलेल्या पत्रामध्ये यशवंत मनोहर यांनी आपली भूमिका अत्यंत परखडपणे मांडली आहे. कार्यक्रमावेळी सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये असे त्यांनी सुचवले होते, परंतु आयोजकांनी ते मान्य केले नाही म्हणून पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचे त्यांनी कळवले आहे. आपल्या पत्रात यशवंत मनोहर म्हणतात, डाॅ. इंद्रजित ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. पण ते झालं नाही. म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.
स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजून घ्यावं. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कारण मी मला नाकारलं तर माझ्यापाशी जगण्यासारखं काहीही नाही. क्षमस्व, असे मनोहर यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
0 टिप्पण्या