शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये करून हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये खळबळ उडवून दिली. खरे तर, सामान्य हिंदू माणसाला शंकराचार्य हे पद काय, त्या पदाचा अधिकार काय, त्यांच्या निवेदनामागे मान्यता कोणती, यांविषयी माहिती नसते. त्यासाठी हिंदूंनीच नव्हे, तर सामान्य भारतीयांनीही शंकराचार्य हे प्रकरण समजून घेणे आवश्यक आहे. सोबत, हिंदुत्ववादी मंडळींना अपेक्षित हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत शंकराचार्यांचे स्थान काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणेही गरजेचे आहे.
प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, की हिंदू धर्माची स्थापना अमुक एका व्यक्तीने अमुक एका तिथीला केलेली नाही. तसेच हिंदू धर्माविषयी अधिकृत व आधारभूत ग्रंथ म्हणून कुठल्याही ग्रंथाला मान्यता नाही. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ‘सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणजे हिंदू’ असे इराणी लोकांनी प्रथम म्हटले. तोपर्यंत या भूभागाला ‘आर्यावर्त’ असे म्हणत. आर्य हा सभ्य, सुसंस्कृत, सज्जन या अर्थाचा शब्द आहे. म्हणजे अहिंसा मानणारे, दुस-याविषयी सहिष्णुता बाळगणारे ते आर्यावर्त - असे बाहेरच्या लोकांचे आकलन होते. आदि शंकराचार्यांनी शृंगेरी येथे 12 वर्षे वास्तव्य केले व मठ स्थापन केला. त्यांनी केदारनाथ येथे गुप्त समाधी घेतली. हिंदू धर्माचे रक्षण करणे, आवश्यक ते हिंदू संस्कार योग्य रीतीने करणे आणि हिंदू धर्मात झालेल्या वादविवादांबद्दल योग्य ते निवाडे देणे यासाठी आपले चार शिष्य भारतातील चार दिशांना पाठवले - म्हणजेच चार पीठे तयार केली. प्रत्येकाला एकेका वेदाची विशेष जबाबदारी दिली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी. तसेच प्रत्येक पीठाच्या शंकराचार्यांना एकेक धर्मसूत्र दिले. त्या धर्मसूत्राचा त्या त्या शंकरायार्चांनी अभ्यास करून त्याचा आशय समाजात रुजवावा, ही अपेक्षा होती. मूळ चार पीठांचे वाद होऊन अनेक पीठे तयार झाली. बहुतेक ठिकाणी मठाच्या मालमत्तेचे वाद न्यायप्रविष्ट आहेत. स्वरूपानंद स्वामी हे द्वारकापीठाचे पीठाधीश, पण त्यांनी जोशी मठाच्या काही भागाचा कब्जा घेतला आहे. ते स्वत: वादग्रस्त आहेत. शंकराचार्यांच्या पीठावर फक्त बामण पुरुष बसू शकतो. आधीचे पीठाधीश आपल्या वारसदारांची नियुक्ती करत.
या पदावर जन्माने बामण नसलेलाही पुरुष बसू शकत नाही किंवा बामण स्त्रीदेखील बसू शकत नाही. विविध जाती, धर्म, पंथ, संप्रदाय यांचा आणि शंकराचार्य पीठाचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. बरेचसे शंकराचार्य आपल्या वतीने एखाद्या प्रतिनिधीची नेमणूक करून अपेक्षित असलेले हिंदू संस्कार व्यवस्थितरीत्या पार पाडले जातात की नाहीत, हे पाहण्याचे अधिकार प्रदान करतात. उदाहरणार्थ- मालेगाव येथे दाणी हे पेशव्यांचे सरदार, त्यांच्याकडे शंकराचार्यांनी हे अधिकार दिले आहेत. पुणे शहरात स्वामी स्वरूपानंद द्वारकापीठाधीश शंकराचार्यांनी शंकर महाशब्दे या श्रीमंत माणसाला आपला प्रतिनिधी नेमले आहे. गुरुपौर्णिमेला त्यांची पाद्यपूजा केली जाते. शंकराचार्य या पदाचे महत्त्व असे आहे की, हत्तीवरून मिरवणुकीने घरी नेऊन त्यांचे पाय धुतले जातात व ते पाय धुतलेले पाणी प्राशन केले जाते. एक डॉक्टर या दृष्टीने माझे असे मत आहे की, पाय धुतलेले पाणी पिणे, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. धार्मिकदृष्ट्या श्रेष्ठ असलेल्या माणसाच्या पायावरही रोगजंतू असतात. त्यामुळे पाद्यपूजेचे पाणी पिणे म्हणजे ‘स्वाइन फ्लू’सारख्या आजाराला हमखास निमंत्रण देणे होय. हिंदू धर्माचा पूर्ण आदर करून असे सांगावेसे वाटते की, कुणीही कुणाच्या पायाचे तीर्थ पिऊ नये. त्याला केवळ तीर्थ म्हटल्याने ते फिल्टर होत नाही, रोगजंतूंपासून मुक्त होत नाही.
स्वामी स्वरूपानंद यांनी पीठावरून (पैकी एक बळकावलेले) तुतारी फुंकली की, साईबाबांची पूजा करणारे हिंदू नाहीत- म्हणून त्यांना गंगास्नानाची परवानगी नाही. साईबाबा संतही नाहीत आणि देवही नाहीत, मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची शक्यता असल्याची आवई उठली आहे; पण हिंदू राष्ट्र बनवायचे म्हणजे, हिंदू संस्कृती व अन्य धर्मीयांची संस्कृती यांच्या सुरेख संगमातून आकारास आलेल्या भारतीय संस्कृतीवर घाव घालणे आवश्यक आहे. ते पाहता साईबाबा, अजमेरचा दर्गा अशी सर्वधर्मीयांना पूज्य असणारी ठिकाणे मोडून काढण्याचा हा डाव असू शकतो. हे काम केले तर आरएसएसची आपल्यावर कृपा होईल, मठाची मालमत्ता वाढत जाईल, असाही एक हेतू शंकराचार्यांच्या वक्तव्यांमागे असू शकतो. या सगळ्यांत धर्मरक्षणाच्या हेतूपेक्षा सत्तास्थानाचा दुरुपयोग अधिक आहे. वस्तुत: हिंदू धर्मातल्या अनेक अधिकारी व्यक्तींनी या शंकराचार्यांना तुम्ही द्वारकापीठाधीश आहात; जोशी मठाचा भाग सोडून द्या, असा सल्ला दिलेला आहे. पण त्यांना सत्तेचा, मत्तेचा मोह आवरत नाही. पुण्यात मुंजाबाच्या बोळात एरंडे स्वामी नावाचे एक शंकराचार्य राहत असत. ते 90व्या वर्षी वारले. त्यांच्या मठाचे दार कायम बंद असे. ते मालमत्तेच्या वादापायी रोज शिवाजीनगर न्यायालयात हेलपाटे मारत. तेवढ्यापुरतेच ते दार उघडले जाई.
1973मध्ये माझा व पुरी पीठाच्या शंकराचार्यांचा दोन दिवस जाहीर वादविवाद झाला होता. त्या शंकराचार्यांचे नाव होते निरंजनदेवतीर्थ. त्यांनी जाहीर वादाचे आव्हान दिले होते. वादविवाद ही आदि शंकराचार्यांपासून असलेली वैदिक परंपरा आहे. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, निसर्गाचा वा ईश्वराचा धर्म विषमता हा आहे. अस्पृश्यता प्रथेचे पालन न केल्यास ईश्वर व निसर्ग यांच्यामध्ये क्षोभ निर्माण होतो. त्यामुळे 1972मध्ये महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ ईश्वरी कोपामुळे पडला, अशी संकटे समतावाद्यांमुळे येतात, अस्पृश्यता प्रथेचे पालन करणे म्हणजे ईश्वराला खुश ठेवणे आहे- या विषयावर आठ दिवस जाहीर वादविवाद ठेवल्यास माझी तयारी आहे - त्या वेळी त्यांचे हे आव्हान स्वीकारले. तेव्हा लक्षात आले की, त्यांच्या प्रतिपादनात तर्कविसंगती व बालिशपणा यांचे प्राबल्य होते. ते स्वत: चांदीच्या मखरात बसून बोलत होते - मी मात्र उभा राहून बोलत होतो आणि मिनिटामिनिटाला ते जल्लोष करत होते- ‘हिंदू धर्म की जय हो, हम जीत गए’ - ‘अधर्मी हार गया’ - ‘बोलो श्रीराम जय राम जय जय राम...’ ‘अधर्म का नाश हो’ - शेवटचे वाक्य उच्चारताना अधर्माचे प्रतीक म्हणून ते माझ्याकडे बोट दाखवत होते. वादात एकदा घेतलेली भूमिका ते मध्येच बदलत. म्हणून हा वादविवादाचा प्रकार निष्कर्षाप्रत येण्यापेक्षा अतिशय मनोरंजक झाला. शंकराचार्य स्वरूपानंद यांच्यामध्येही मनोरंजनाचाच हा गुण प्रकर्षाने दिसून येतो. येथे प्रश्न धर्मनिष्ठेचा नसून, आपणा सर्वांची भारतीय असण्यावर निष्ठा आहे का, हा आहे. मी स्वत: अनेक पटींनी धार्मिक आहे. हिंदू धर्मातल्या सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा तत्त्वांकडे आकर्षित झालो आहे. इस्लाममधील बंधुभाव, मानवता, शांती या मूल्यांचे मला आकर्षण वाटते. ज्यांच्यावर कुणी प्रेम करत नाही त्यांच्यावर तू प्रेम कर, हा ख्रिश्चन धर्मातील संदेश मला खूप भावतो. भगवान गौतम बुद्धांची करुणा, शीख धर्मातील समर्पित भक्ती, वीरशैव पंथातील स्त्रियांना दिलेले महत्त्व, या सा-या गोष्टी एकत्र केल्या तर भारतीयत्व तयार होते.कुणीही सच्चा भारतीय या शंकराचार्यांच्या उपदेशानुसार आपले भारतीयत्व सोडायला तयार नाही, हीच या काळातली स्वागतार्ह गोष्ट आहे.
तामिळनाडू पोलिसांनी 11 नोव्हेंबर 2004ला हैदराबादमध्ये शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामींना अटक केली होती. कांची मठाचे प्रबंधक शंकररमण यांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. मंदिर परिसरात 3 सप्टेंबर 2004ला शंकररमण यांची हत्या करण्यात आली होती. संशयाच्या आधारावर पोलिसांनी स्वामींना अटक केली होती कारण शंकररमण त्यांच्याविरोधात मोहीम चालवत होते. अपुऱ्या पुराव्यांमुळे पुदुच्चेरी कोर्टानं 13 नोव्हेंबर 2013 ला सर्व आरोपींची सुटका केली होती.
0 टिप्पण्या