संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे त्यामुळे पुण्याचे नामांतर संभाजीनगर करा

  मुंबई
औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वेगळीच मागणी पुढे केली आहे.   'औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, ही राजकीय मागणी आहे. महानगरपालिका निवडणूक आल्यानंतर अशी मागणी नेहमी केली जाते. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करा अशी आमची मागणी आहे,' अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण भलतंच तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, तर काँग्रेस आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या मागणीला विरोध केला आहे. हा सगळा वाद रंगत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या नामांतराबाबत वेगळीच मागणी केली आहे.

 नामांतराने जनतेचे मुलभूत  प्रश्न सुटणार आहेत का- सुरेश माने

औरंगाबादचे नामांतर हा  प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. मनसेसह भाजप या नामांतर प्रश्नावर जनतेची सहानूभुती मिळवत नामांतर झालेच पाहिजे असा नारा दिला आहे. मात्र नामांतर झालेच पाहिजे असा आक्रोश करणारी भाजपा पाच वर्षे सत्तेवर असताना तो प्रश्न का निकाली काढला नाही असा थेट सवाल बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सर्व्हेसर्वा सुरेश माने यांनी केला आहे. तसेच औरंगाबाद सारख्या जिल्ह्यात अद्यापही कचऱ्याची आणि पाण्याची समस्या भेडसावत असताना हे प्रश्न नामांतराने सुटणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीकरिता ते ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध केला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.  

'शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. हा प्रस्ताव 20 वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.  नामांतराच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याच्या वृत्ताचंही नवाब मलिक यांनी खंडन केलं आहे. ''अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीतील अजेंडावरील नाहीये. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही सरकारला कोणताही धोका नाही,' असंही ते म्हणाले आहेत. 

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या मुद्यांवर एकत्रित बसून तोडगा काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी औरंगाबाद जिह्यांच्या नामांतराचा मुद्दा काही घटकांकडून पुढे केला जातो आहे, अशी टीकाही केली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या या मुद्यावरून राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानं नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे.  आता महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्राया समाजवादी पक्षानंही नामांतर योग्य नसल्याचं म्हटलं आहे.  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA