Trending

6/recent/ticker-posts

`आयुक्त साहेब वेळ द्या' पालकमंत्र्यांसमोर मनसे कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

वसई : 
अंतर्गतवादामुळे एकीकडे नवी मुंबईतील पुर्ण कार्यक्रमच शिवसेनेला रद्द करावा लागला असतानाच आता  वसई विरार  महापालिका परिवहन सेवेच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच मनसेने गोंधळ घातला.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा होता.  महापालिका आयुक्त सातत्याने जाणीवपूर्वक भेट नाकारत असल्याचे कारण देत भर कार्यक्रमात आयुक्तांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलीस स्टेशनलाही मनसे कार्यकर्त्यांना राडा केला. 
 
मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या भेटीची वेळ मागत होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ झाला. काही पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. यावेळी मनसेकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला. पोलीस सरकारचे दलाल असल्यासारखे वागत आहेत. सत्ता येते जाते पण पोलिसांनी पोलिसांसारखे काम करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद घोषणा देणे चूक आहे का? सत्तेची दलाली आणि माज पोलिसांनी करू नये, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. एवढाच माज असेल तर वर्दी दोन तास बाजुला ठेवून समोरासमोर भिडा आणि मग दाखवतो महाराष्ट्र सैनिक काय आहे, असा आक्रमक पणा घेत पोलिसांनाच इशारा दिला.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उदघाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे वसईत आले होते. मंगळवारी दुपारी वसईच्या वसंत नगरी मैदानात कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.  आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. `आयुक्त साहेब वेळ द्या' अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडाला. कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याचे पोलिसांना कुणकूण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 35 कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतलं होतं. तरी पोलिसांची नजर चुकवून  कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.  




Post a Comment

0 Comments