युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार महाराष्ट्राचे सुपूत्र सोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला. सात कोटींचा या पुरस्काराची घोषणा लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हेत तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत देशातील कोणत्याही शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला नाही. तर भारताला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात ते ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मेहनतीमुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी स्वत: त्यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले. यावेळी रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले. क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 7 कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.
आयएएस तुकाराम मुंढे यांनी देखील या शिक्षकाला त्यांच्या कार्यामुळे सलाम ठोकला आहे. तुकाराम मुंढे यांनी रणजितसिंह डिसले यांच्यासाठी एक ट्ववीट केलं आहे. Kudos to The Real Leadership in Education म्हणजे शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा असं ट्ववीट तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
0 टिप्पण्या