केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन

“सुधारणा नको, कायदेच रद्द करा”; शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम

 मुंबई
 केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला आता देशभरातून विरोध होत आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतक-यांनी दिल्लीत मागील आठ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलन आता महाराष्ट्रातही सुरु झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने देशभरातील शेतकरीही संतप्त झाले आहेत. राज्यातील शेतक-यांनी आज (दि ३) रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केलं.  ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. घोषणाबाजी करत या आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्यांना जोडे मारो आंदोलन केलं. काही ठिकाणी तर शेतक-यांनी जेलभरो आंदोलन केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापुरात माकप नेते नरसय्या आडम यांना ताब्यात घेण्यात आल्याने वातावरण अधिकच तापलं आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व सीटू यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली २०००हून अधिक शेतक-यांनी शहापूर एसटी स्टँडवरून मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेला. पालघरमध्येच काँग्रेस, कष्टकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन केलं. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथे किसान काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी शेतक-यांनी वाडा-भिवंडी मार्गावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला.

सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतक-यांनी सोलापुरातील संत तुकाराम चौकात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रास्तारोको केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आडम यांच्यासह माकपच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं होतं.  उस्मानाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शांततेत आंदोलन केलं. या आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन आपलं गा-हाणं मांडलं.

नाशिकमध्ये शेतकरी समन्वय समितीचा एल्गार पाहायला मिळाला. समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतक-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. नाशिकमध्ये किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल रात्रीपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. इचलकरंजीमध्येही शेतक-यांच्या आंदोलनाचा आसूड कडाडला. काँग्रेस, जय किसान शेतकरी संघटना आणि माकपाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. माकपाने के.एल. मलाबादे चौकात निदर्शने करत रास्ता रोको केला.

दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये गुरुवारी झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये सुधारणा नको तर कायदेच रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले.  आणि त्यांनी सरकारला ठामपणे सांगितलं की, “संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि हे कायदे रद्द करण्यात यावेत.” शेतकऱ्यांचा सरकारवर इतका राग होता की दुपारी तीन वाजता त्यांनी सरकारी जेवण घेण्यास नकार दिला. गुरुद्वारातून पाठवलेलं जेवण त्यांनी जमीनीवर बसून खाल्लं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या