सीमा प्रश्न कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच... निषेध दिनी पोलिसांची नाकेबंदी

सीमा प्रश्न कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच... निषेध दिनी पोलिसांची नाकेबंदीगेली कित्येक वर्षे खिजगणतीत असलेला महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न अद्यापही जैसे थे अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना कर्नाटक सरकारच्या छळाला सामोरे जावे लागत आहे. याची प्रचिती आजही दिसून आली. १ नोव्हेंबर काळा दिन म्हणून जाहिर झाल्यानंतर सर्वत्र कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त होत आहे. बेळगावात सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी करुन मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या काळ्या दिनाच्या धरणे आंदोलनात जनता पोहोचू नये यासाठी शहरातील विविध भागात नाकेबंदी करण्यात आली असून लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकेच नाही तर काळे कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांना जाब विचारला जात आहे. इतकेच नव्हे तर  काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे असणारे बुम खेचून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ही मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे माध्यमांची देखील दडपशाही पोलिसांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. माध्यमांच्या या दडपशाहीचा निषेध पत्रकार वर्गाकडून करण्यात आला


बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळते.भाषावर प्रांतरचनेच्या बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी निषेध फेरी व सभाही होतात. कोरोना महामारीमुळे यंदाची निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन प्रशासनाने परवानगी दिली. पण ही परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एकावेळी केवळ ५० लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली जात आहे.  सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घातली आहे. लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत आहे. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.


 


बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो. आता सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे पूर्ण मंत्रिमंडळ आज 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे. याविषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ' कर्नाटकमधील मराठी सीमावासियांवर होणारे अत्याचार, अन्याय, जुलूम याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या हाताला काळी फिती बांधून निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्र सरकारमधील सर्व याचा निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील कर्नाटकातील सीमा प्रांतात अडलेल्या लोकांच्या पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या मागे उभे आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत आहोत. बेळगाव मधील मराठी भाषिकांचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.'


 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या