‘माझी वसुंधरा’ अभियानाची लोकचळवळ करा - डॉ. रुपाली सातपुते

ठाणे जिल्हा परिषदेच्या १३ ग्रामपंचायत क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ अभियानाची अंमलबजावणी होणार
अभियानाची लोकचळवळ करा - मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांचे आवाहन


ठाणे
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांचे गुणवत्तापुर्ण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १३ ग्रामपंचायत अंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सबंधित अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांची बैठक संपन्न झाली. हे अभियान केवळ अभियान म्हणून न राबवता लोकचळवळ झाली पाहिजे. असे आवाहन मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी उपस्थितांना केले.


मानव निर्मित प्रदूषणामुळे व जल, वायू परिवर्तनामुळे जैवविविधतेवर, पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे अनेक निसर्गिक आपत्ती व विविध नवीन आजाराच्या साथी यांचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासंदर्भात निसर्गाशी असणारे मानवाचे नाते पुन्हा एकदा वेगवेगळ्या परिभाषित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर माझी वसुंधरा अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी गाव कृती आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. या बैठकीला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच.एल. भस्मे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी शहापूर अशोक भवारी, गट विकास अधिकारी अंबरनाथ शीतल कदम, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ.प्रदीप घोरपडे, तसेच सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. 


अभियानात करण्यात येणारी कामे - अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे या मुद्यांशी संबंधित कामे केली जातील. तर वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वामध्ये हरित कायद्याचे पालन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण जनजागृती करण्यावर भर दिला जाईल. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी दिली.


अभियानात निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायती- ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळ, भिवंडी तालुक्यातील खोणी, कोन, कारिवली, काटई, राहनाळ, पिंपळघर, शेलार, काल्हेर, शहापूर तालुक्यातील वासिंद, मोखावणे, आसनगाव, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, आदि १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १०हजारापेक्षा अधिक लोकसंख्यां असणाऱ्या या  ग्रामपंचायती आहेत.


नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक - अभियानाचे कामकाज गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्याचे गट विकास अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहायक नोडल अधिकारी आणि समन्वय अधिकारी म्हणूनही नेमणूक करून अभियानाची अंमलबजवणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या