बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था, रुग्णालयातील परिसरात डुकरांचा वावर
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बेभरवशाने चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य सेवेच्या नावावर फक्त रूग्णांचे धिंडवडे काढले जात असल्याचे चित्र आहे.त्यातच या रुग्णालयाच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडालेला आहे. रुग्णालय प्रशासनाच्यावतीने रुग्णांच्या नातेवार्इंकावर सुध्दा कुठलेच नियंत्रण नसल्याने रुग्णांचे नातेवाईक सुध्दा उरलेले अन्न हे मोकळ्या जागेत फेकत असल्याचे चित्र बघावयास मिळते.त्यामुळे येथील परिसरात डुकरांचा मुक्त संचार सुरु आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात तंबाखूच्या पिचकाऱ्या नी भिंती रंगलेल्या, पिण्याच्या पाणवठ्यावर कुजलेले अन्न आणि घानच घान शिळे अन्न फेकल्याने त्या दुर्गंधीमुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे स्वच्छतेच्या कंत्राट असलेल्या स्वच्छता कामगारांनी अद्यापही लक्ष दिले नसल्याचे चित्र आजही बघावयास मिळते. एकतर रूग्णालय परिसरात पाहिजे तशी स्वच्छता नाही. शिवाय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार रूग्णांच्या जीवावर उठला आहे. कुठेच सॅनिटीझर नाही रोगी वाऱ्यावर दिसत आहेत. रूग्णालयातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारला असता रूग्णालयातील अस्वच्छतेचा गलथान कारभार आज नजरेस पडला.
अवघ्या जिल्ह्यातील नागरिक उपचाराची आस धरून येथे येतात. मात्र येथे उपचाराच्या नावावर अक्षरश: रूग्णांचे हाल होत आहेत. येथील रूग्णालयांची स्थिती बघावयाची झाल्यास रूग्णालय परिसरात सांडपाणी व घाण ही सामान्य बाब झाली आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना घाण व चिखलातच आपले धुणे- भांडे करून त्याच वातावरणात वावरावे लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेचा दुष्काळच दिसून येतो. सफाई अभावी रूग्णालय परिसरात ठिकठिकाणी शिळे अन्न पडल्याचे दिसून येते. त्यावर माश्या व किटकांसह डुकरांचा मुक्त संचार सुरु आहे. रुग्णालय परिसरात केरकचरा मोठ्या प्रमाणात वाढलेला असून कचऱ्याचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप मुक्तसंचार करतांना दिसून येतो कचक्तयातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे.अशा या वातावरणात रुग्णांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे. यावरून या रूग्णालयांत उपचार घेणारे रूग्ण कितपत सुरक्षीत आहेत यावरच प्रश्नचिन्ह लागते.
0 टिप्पण्या