रावणदहन प्रथा बंद करा, अन्यथा ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा- आदिवासी संघटनांची मागणी

  • न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! अन्यथा ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
  • अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
  • महाराष्ट्रात आदिवासी समाजासह वीरशैव लिंगायत समाजातही महात्मा रावण पूजनीय.
  • महात्मा रावण दहन करण्याची प्रथा बंद करावी यासाठी आदिवासी समाजासह वीरशैव लिंगायत समाजही प्रयत्नशील.
  • आदिवासी समाजाच्या या मागणीला शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा जाहिर पाठिंबा.
 
    महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महान, दार्शनिक, संगीततज्ञ, राजनीतीतज्ञ, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट, नगररचनाकार, समताधिष्ठित, समाजव्यवस्थेचा उद्गाता, साहित्यिक, न्यायप्रिय राजा असून देवांचा देव शंकराला प्रसन्न करणारा पहिला भक्त असून अशा अनेक गुणांचा अविष्कार असणारा महात्मा राजा होता. अशा महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी, वर्णांध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. त्यांस खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे.
 
        आदिवासी समाजातील,वीरशैव लिंगायत व इतर समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे. वास्तविक राजा रावण सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.आदिवासी तसेच वीरशैव लिंगायत समाजात प्रमुख देवते पैकि एक महत्वाची देवता म्हणून महात्मा रावण यांची पूजा अर्चा केली जाते. तामिळनाडूमध्ये रावणाची साधारणतः ३०० पेक्षा अधिक मंदिरे आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहेत.परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा उद्गाता असलेल्या, न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देऊच नये तर ही प्रथाच बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
       जर का  दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर सर्व आदिवासी समाजाकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल. या दरम्यान जे सवर्ण या विकृत विक्षिप्त कृतीचे समर्थन करतील? आमच्या आदिवासी बांधवांच्या भावना दुखावतील, आमच्या न्यायप्रिय राजाला अपमानित करतील अशा लोकांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३(अ),२९५,२९८,मुंबई पोलिस अँक्टनुसार १३१,१३४,१३५ कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.याकरिता रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल तालुक्यातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांकडून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.सदर निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा सरचिटणीस, पञकार गणपत वारगडा, पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बी. पी. लांडगे, समाजसेविका कविता निरगुडे, बिरसा क्रांती दलचे चेतन बांगारे, पांडुरंग गावंडा, एकनाथ वारघडा, प्रकाश शिद, प्रणाली वाघ, संगीता निरगुडे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.
 
महात्मा रावण हे आदिवासी समाजाचे राजे होते, दैवत होते,  न्यायप्रिय राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाजात महात्मा रावण पूज्यनीय आहेत त्यामुळे  दस-याला महात्मा रावण दहन करण्याच्या प्रथेला आमचा विरोध असून ही प्रथा भारत सरकारने बंद करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.    
- प्राध्यापक मनोहर धोंडे. ( संस्थापक अध्यक्ष शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना.)
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA