मुलाला क्लीन चिट देण्यासाठी मेळावा - नारायण राणे

मुलाला क्लीन चिट देण्यासाठी मेळावा - नारायण राणेमुंबई
'कालचा दसरा मेळावा फक्त आदित्य ठाकरेंना क्लीन चिट देण्यासाठी होता. जनतेसाठी नव्हताच. आम्ही दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कधीही आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्हाला बोलावे लागले. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल,' असा घणाघाती आरोप नारायण राणेंनी केला.  सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते..


'बेडूक कोणाला म्हणता ? वाघ होतो म्हणून बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं. दादागिरी कराल तर गेल्या 40 वर्षातलं मातोश्रीच्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन',  'मुख्यमंत्र्यांनी उगाच वाघ असल्याचा आव आणू नये. खालच्या स्तरावरची भाषा वापरू नये. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने मी शांत आहे. दादागिरी केली तर मातोश्रीच्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण शिवराळ आणि निर्बुद्ध होते. आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी कधीच असे भाषण केले नव्हते. आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषण शैलीने आणि विचाराने पदाची आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. पण कालच्या भाषणात शिवराळपणा सोडून काय होते? भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता. आपण काय बोलतो? कुणाबद्दल बोलतो? याचेही भान त्यांना नव्हते', असे राणे म्हणाले.


'उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नावावर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. उद्धव ठाकरेंनी बेइमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांनी 56 आमदारांसाठी बेइमानी केली',  'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणे होते. अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA