'बहुजन संग्राम' चे कोरोना मदत कार्य डिसेंबर अखेरपर्यंत सुरूच राहणार ! - भीमराव चिलगावकर
अशोक विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहूर्तावर भांडुप मध्ये
रोजगार गमावलेल्या गोरगरिबांना बहुजन संग्रामतर्फे अन्न-धान्य किराणा वाटप.
मुंबई,
लॉक डाऊनच्या काळात हातचा रोजगार सुटल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळल्या श्रमजीवी कुटुंबांना बहुजन संग्रामतर्फे गेले सहा महिने अन्न धान्य- किराणाचे वाटप जागोजागी सुरूच आहे. विजया दशमीला रविवारी भांडुप ( पश्चिम) येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात गरजू कुटुंबांना धान्य आणि किराणाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना आमदार रमेश कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष पवनकुमार बोरुडे, महिला आघाडी अध्यक्षा रंजना कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा शेजवलकर, लता निकम, कामगार नेते एस.एम.जानराव, सुखदेव निकम,सखाराम सोनावणे, वसंत म्हस्के, सुमेध निकम, सुबोध निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
गरजू गरिबांना अन्न धान्य, किराणा वाटपाचा हा उपक्रम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे, असे सांगून बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर म्हणाले की, पुढील दोन महिन्यांत नाशिक, पुणे, औरंगाबाद या शहरांतील नाका कामगार, बांधकाम मजुरांच्या कुटुंबांसाठी धान्य,किराणा वाटप करण्यात येणार आहे. तब्बल सहा महिने गरजू गरिबांच्या घरातील चूल विझू न देण्याची काळजी वाहणाऱ्या बहुजन संग्रामचा उपक्रम आणि कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवपर उदगार आमदार रमेश कोरगावकर यांनी यावेळी काढले.
0 टिप्पण्या