नोंदणीकृत वर्तमानपत्रांना केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी- खासदार राहुल शेवाळे

नोंदणीकृत वर्तमानपत्रांना केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी


खासदार राहुल शेवाळे यांची माहिती व प्रसारण मंत्र्यांकडे लेखी मागणी
मुंबई,


लॉकडाऊमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या नोंदणीकृत वृत्तपत्रांना केंद्र सरकारने 1 ते 5 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना दिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी नोंदणीकृत वृत्तपत्रांसमोरील आर्थिक संकटाची माहिती दिली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच लहान-मोठ्या उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र व्यवसायलाही यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, देशभरातील सर्व भाषांमधील नोंदणीकृत दैनिके, पाक्षिके, नियतकालिके, अनियातकालिके, साप्ताहिके, मासिके यांना केंद्र सरकारने 1 ते 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. त्यामुळे या वृत्तपत्र व्यावसायिकांचे मनोबल वाढून त्यांना भविष्यात पुन्हा उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. माहिती व प्रसारणमंत्री  प्रकाश जावडेकर खासदार शेवाळे यांची  मागणी पूर्ण करतील का याकडे सर्व पत्रकारांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad