माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पुर्व) मुंबई. मधील ११ जुलै १९९७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना च्या निषेधार्थ आंबेडकरी समाज्याच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद भीम सैनिकांना १६ व्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन !!
११ जुलै १९९७ची सकाळ घाटकोपरच्या रमाबाई नगरासाठी दुर्दैवी सकाळ ठरली. कुणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी वस्तीत वणव्यासारखी पसरली आणि हा हा म्हणता हजारो लोक रस्तावर उतरले. घाटकोपरचा हाय वे या संतप्त लोकांनी बंद पाडला. या वेळी लोकांना आवरण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकडीने मात्र माणूसकीला काळीमा फासला. या दलाचे नेतृत्व करणाऱ्या सब-इन्स्पेक्टर मनोहर कदम याने पोलिसांना संतप्त जमावावर फायर करण्याचे आदेश दिले. या फायरिंगमध्ये १० जणांचा बळी गेला, तर २६जण जखमी झाले. गंभीर गोष्ट म्हणजे, पुतळा विटंबना झाली ते ठिकाण तसंच संतप्त जमाव जिथे रास्ता रोको करत होता ते ठिकाण आणि कदमच्या आदेशामुळे फायरिंग करण्यात आलेली जागा यांच्यात सुमारे २००मीटरचं अंतर होतं. म्हणजे संतप्त जमावाला आवरण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला नव्हता, हे स्पष्टच आहे.
दरम्यानच्या काळात रमाबाई नगराला भेट द्यायला आलेल्या रामदास आठवलेंनाही त्यांच्याच समाजाच्या लोकांनी पिटाळून लावलं होतं ! संतप्त लोक कुणाचंच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांची एकच मागणी होती- निरपराधांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनोहर कदमला फाशी देण्यात यावी. त्यासाठी कदमवर कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवणं आवश्यक होतं. पण राज्य सरकारने त्याच्याविरोधात कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदवला. आता न्यायालयाने कदमला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही कलम ३०४अन्वये देण्यात येणारी सर्वात मोठी शिक्षा आहे.
या सर्व घटनेला एक राजकीय पाश्र्वभूमी देखील आहे. ती सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं ठरेल. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. कदमने केलेला गोळीबार योग्य होता, हे दाखवणसाठी टँकर स्टोरी रचण्यात आली, असं इथला प्रत्येकजण सांगतो. पुढे ही टँकर स्टोरी युती सरकारला महागात पडली, हे वेगळं सांगायला नकोच.
रमाबाई नगरातल्या या हत्याकांडानंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला. पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली. मनोहर कदमसाररखा अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, कदम याच्यामुळे रमाबाई नगरीत झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपकाही आयोगाने ठेवला होता.
निकाल लागला खरा पण लढाई मात्र संपलेली नाही. ज्या लोकांवर मनोहर कदमने गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्या साक्षीदारांनाच ‘दंगलखोर’ ठरवण्यासाठी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते. त्यामुळे रमाबाई नगरातले सामान्य लोक ’आम्ही गुन्हेगार नाही’ हे सिध्द करण्यासाठी अजूनही धडपडताहेत, कोणतीही चूक नसताना न्यायालयात चकरा माराव्या लागल्या. पण एक प्रश्न रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मानगुटीवर भूतासारखा बसलेला आहे प्रत्येकाला तो सतावतोय- ११ जुलै १९९७ रोजी रमाबाई नगरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना कुणी केली ? रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मनात खदखदणारी गोष्ट ती हिच. का केली कुणी आमच्या दैवताची विटंबना ? रमाबाई नगरातला प्रत्येक ‘मास्तर’ हाच प्रश्न सरकार नावाच्या ‘हिंदुरावां’ना विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तो पर्यंत मास्तर आणि हिंदुरावांमधला हा ‘सामना’ असाच सुरु राहणार आहे. कदाचित हा ‘सामना’ संपत नाही तोपर्यंत तरी रमाबाई नगरातल्या लोकांना आपल्याला न्याय मिळालाय असं वाटणार नाही. तुम्हाला तरी माहितीए का; का आणि कुणी केली आपल्या दैवताची विटंबना ?
धन्यवाद- राज जाधव सर(http://advrajjadhav.blogspot.in/2012/07/blog-post_10.html)
संदर्भ - या घटनेवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेख.
२३ वर्षानंतरही रमाबाई आंबेडकर नगर न्यायाच्या प्रतिक्षेत...
ज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.११ जुलै २०२० रोजी रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडुन २३ वर्षे पुर्ण होत आहेत...
मुंबईतील घाटकोपर येथील श्रमिक, कष्टकरी, लोकांची वस्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर. या वस्तितील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने एकत्रित येऊन वस्तीमध्ये असलेल्या पोलीस चौकीच्या अगदी जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला.११ जुलै १९९७ साली भल्या पहाटे कोणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. शेजारील पोलीस चौकीमध्ये पोलीस हजर असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता. पहाटे ही बातमी संपूर्ण रमाबाई नगरात वेगाने पसरली. वस्तीतील सर्व आंबेडकरी जनतेने एकच आक्रोश केला. सर्व वस्तीमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोक पुतळ्याभोवती जमु लागले होते. आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरू लागली. एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने चपलांचा हार खाली काढला. लोक आरोपीच्या अटकेची मागणी धरुन वस्तीच्या शेजारील मुख्य हायवे वर ठाण मांडून बसले. तेवढ्यात अचानक खाड खाड बुट वाजवीत सशस्त्र जवान गाडीतून उतरले त्यांनी जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बंदुका रोखून धरल्या आणि तेवढ्यात फौजदार मनोहर कदम याने थेट गोळीबाराचा आदेश दिला. त्यानंतर जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बेछुट पणे तीव्र असा गोळीबार करण्यात आला. दहा लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले. अनेक लोक प्रचंड जखमी झाले. रमाबाई नगरची संपूर्ण वस्ती रक्ताने माखली. काय करावे कुणाला सुचेनासे झाले. अंबेडकरी जनतेवरील अत्यंत भयानक आणि विषेश म्हणजे सरकारी यंत्रणेकडुनच झालेला हा खुनी भयावह हल्ला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अंबेडकरी जनतेच्या इतका क्रुर आणि भयानक हत्याकांड घडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरेंनी गोळीबाराचा आदेश देणाऱ्या फौजदार मनोहर कदमची जाहीर प्रशंसा केली. संपूर्ण वस्ती संतापली होती. आंबेडकरी समाजामध्ये असंतोषाचा आगडोंब झालेला होता. निष्क्रिय ‘दलित’ पुढाऱ्यांना रमाबाई नगरच्या जनतेने वस्तीमध्ये चांगलाच चोप दिला. त्यानंतर अनेक गटबाज नेते पळुन गेले होते. घराणेशाहीचा वारसा सांगणारे सुद्धा नंतर रमाबाई नगरच्या वस्तीकडे फिरकले नाहीत. ज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या स्थापने नंतर सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्या. गुंडेवार आयोग स्थापन केला. न्यायालयीन लढाई सुरु झाली. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने आंदोलनात सातत्य ठेवले. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई झाली. अहवाल पटलावर आला. प्रसिद्ध झाला. न्या. गुंडेवारांनी हा गोळीबार निशस्त्र व शांत जनतेवर केला असा अभिप्राय दिला. नंतर आघाडी सरकार आले. त्यांनी मनोहर कदमवर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांनी फिर्याद नोंदवली. कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरू झाल्या. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या अथक परिश्रमाने रमाबाई नगरच्या वस्तीमधील कार्यकर्ते खोट्या केसेस मधून निर्दोष सुटले. विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले. गोळीबाराचा आदेश देणारा फौजदार मनोहर कदमला जन्मठेप झाली. पण तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याचे अपिल मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे..
आज रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडाला २३ वर्षे पुर्ण होत आहेत.. या २३ वर्षांत खूप काही बदलले आहे.. ज्या वस्तीमध्ये जातीयवादी नेते यायला सुध्दा घाबरत होते आज त्याच वस्तीमध्ये कमळाच्या फुलाचे आणि धनुष्य बाणाचे जोरदार स्वागत होत आहे.. ज्यांनी मनोहर कदमला कायम पाठिशी घातले त्यांच्याशीच खुलेआमपणे राजकीय सौदेबाजी होताना दिसत आहे. अर्थात हे सर्व ब्राम्हणवादी शक्तींच्या युतीच्या शामियान्याच्या वळचणीला गेलेल्या आपल्या संधिसाधू जोकर पुढाऱ्यांमुळे...
दरवर्षी ११ जुलै रोजी रमाबाई नगरात वेगवेगळ्या रिपब्लिकन गटांचे भरगच्च फ्लेक्स, बॅनर लागलेले असतात. अनेक नेते पुतळ्याला अभिवादन करायला येवून मोठमोठे भाषण ठोकून जातात. परंतु रमाबाई आंबेडकर नगर आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
0 Comments