एकाच पक्षाची सत्ता असूनही मुंबई व ठाण्याच्या रुग्णात औषधावरून भेदभाव
ठाणे
कोरोनाची लागण झालेल्या अत्यवस्थ रूग्णांच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण कमी करण्यासाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन सध्या महत्वपूर्ण ठरत आहे. मुंबई महापालिकेने तात्काळ जूनमध्ये निविदा काढल्यामुळे मुंबईत रेमडेसिव्हिर इंजेक्शन सध्या काही प्रमाणात तरी उपलब्ध आहे. मात्र ठाणे महापालिकाच्या ढिसाळ कारभारामुळे ही सुविधा अद्यापही ठाणेकरांना उपलब्ध झालेली नाही. दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची निविदा काढण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. याला अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे औषध ठाणेकरांना मिळण्यासाठी सप्टेंबर उजाडेल, गेल्या दीड महिन्यात महापालिकेने ही प्रक्रिया का राबवली नाही, असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ठाण्यात पुन्हा संचारबंदी करण्याची वेळ आली. मात्र प्रशासन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करित असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मे महिन्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये केंद्राच्या कोरोना टास्क फोर्सने भेटी देऊन मृत्यू दर कमी करण्यासंदर्भात महापौर आणि आरोग्य विभागाला उपाय-योजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ठाण्यात दिवसागणित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज ठाणे महापालिकेच्या हद्दीत अनेक गंभीर रूग्ण आहेत, ज्यांना या औषधाची गरज आहे. पण त्यांना हे औषध मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनाही रूग्णाचा जीव वाचवण्यात अपयश येत आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी फक्त कागदी घोडे हलवण्यापेक्षा आयुक्तांनी हे औषध वेळीच उपलब्ध करावे, एकाच पक्षाची सत्ता असूनही मुंबई व ठाण्याच्या रुग्णात औषधावरून भेदभाव का? मेल्यावर चिलखत घालून काय उपयोग, औषधासाठी सुरु असलेली रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट थांबणार कधी? कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर औषध ठाणे महापालिका कधी आणणार? नेमके हे औषध कधीपर्यंत मिळण्याची आहे शक्यता ? असे विविध प्रश्न मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी उपस्थित केले आहेत.
सिप्ला, हिटेरो या दोन कंपन्यांकडून रेमडेसिव्हिर या औषधाचे उत्पादन केले जाते. हे औषध काही ठिकाणी औषध विक्रेत्यांना न देता ते रूग्णालयांना पुरवण्यात येत आहे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे या औषधाचीही मागणी वाढत आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सध्या ५४०० रूपये आहे. या औषधांची मागणी वाढल्याने काळाबाजारही सुरू झाला आहे. याचबरोबर टोसीलि झुमॅब नावाचेही दुसरे महागडे इंजेक्शन काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे. त्याची किंमत २१ ते ३२ हजारांच्या घरात आहे. पण या औषधांचा काळाबाजार होत असल्याने या औषधाची वाढीव दराने विक्री होत आहे. ठाण्यातील रूग्णांना हे औषध लवकर उपलब्ध करुन देताना काळाबाजार होणार नाही याचीही दक्षता पालिकेने वेळीच घेणे आवश्यक असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रुग्णांना प्रति वायल ४१५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे औषध मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रूग्णांना मोफत भेटणार आहे. ठाणेकरांना संपुर्ण डोससाठी २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. पालिकेने सध्या हे औषध ठाण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या