फी भरण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश
पनवेल संघर्ष समितीचा 'शिक्षण सम्राटां'ना दणका!
पनवेल:
पनवेलसह नवी मुंबईतील शाळा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पालक वर्ग, फी वाढ आणि यंदाची फी भरण्यासाठी शाळेकडून सक्ती होत असल्याने मेटाकुटीला आला आहे. पनवेल परिसरातील काही शाळा प्रशासनाने पालकांना फोन करून फी भरण्याचा तगादा लावला आहे. काही शाळांनी दोन वर्षात वाढणाऱ्या फी च्या नियमांवर बोट ठेवून फी वाढवली आहे. त्यांचे कायद्याने कान पिळण्याची मागणी संघर्ष समितीने पनवेलचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे केली होती.
साबळे यांनी सर्व शाळांना तंबी देवून फीसाठी सक्ती केल्यास अथवा फी वाढीचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र शासनाचे कलम 2, 3 व 4 तसेच साथीरोग 1897 अन्वये शाळा प्रशासनावर शासनाच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात लेखी तंबी दिली आहे. साबळे यांच्या आदेशामुळे लाखो पालकांना अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये पालकांचा खिशा आधीच फाटला असताना शाळांनी मुजोरपणे पाल्यांची फी भरण्याची सक्ती केली आहे. काही शिक्षण सम्राटांनी फी वाढवण्याचा नतद्रष्टेपणा केला आहे. त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. तशी नोटीस शाळा व्यवस्थापनाला बजावली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी दिली. शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयांचे पालकांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव अजय मेहता, शिक्षण सचिव वंदना कृष्णा आदींना 7 जूनला तातडीने पत्रव्यवहार करून फी वाढ आणि फी भरण्याची शाळांची सक्ती याविषयी तक्रार केली होती. त्याला अनुसरून राज्य शासनाने दुसऱ्याच दिवशी शिक्षण विभागाला त्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शासन निर्णय धाब्यावर बसविणाऱ्या संस्थाचालकावर कठोर कारवाई करावी - मनविसे
- JANATA exPRESS -
https://prajasattakjanata.page/tp2hfd.html
0 टिप्पण्या