अवघ्या काही दिवसांतच सर्व यंत्रणा कोलमडून पडली
ठाणे
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागात कोरोनाने शिरकाव केला असुन या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. ठाणे पूर्वतील पारशीवाडीत राहणारे सुजीत नार्वेकर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा -मुलगी असा परिवार आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील सुजीत यांना ताप आल्याने 10 जून रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यापासुन संघटनेचे राजु कांबळे, सुजीत लोंढे आदीनी नार्वेकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. मात्र कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज पहाटे ह्लदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यु ओढवला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्मचारी वर्ग धास्तावला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज १५० ते २०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असे ठाणे कोव्हीड-19 हॉस्पीटल ठाणेकरांसाठी सुरु करण्यात आले. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेडस असून ५०० बेडस हे सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा असलेले हे अद्ययावत रुग्णालय आहे. या शिवाय सिव्हील रुग्णालय आणि इतर रुग्णालयेही उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व रुग्णालयांमधून रुग्णाला हॉस्पिटल कोणते मिळू शकते, कुठे किती बेड्स शिल्लक आहेत, याची अद्ययावत माहिती देण्यासाठी एक अॅपही तयार करण्यात आले. परंतु, अवघ्या काही दिवसांतच ही सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार तर सोडाच अॅम्ब्युलन्स असूनही वेळेत मिळत नाही.
ठाणे कोव्हीड-19 हॉस्पीटलमधील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर 24 आयसीयू बेडस्, 10 बेडस् डायलेसिस कोव्हीड रुग्णांसाठी, 10 बेडस् ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. दुस-या आणि तिस-या मजल्यावर प्रत्येक 26 आयसीयू बेडस् आणि 119 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. तर चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेडस् उपलब्ध आहेत. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 69, आठव्या मजल्यावर 67, नवव्या मजल्यावर 67 बेडस् आणि दहाव्या मजल्यावर 22 बेडस् असे एकूण 1024 बेडसची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेडस् निर्माण करता येऊ शकतात. या रुग्णालयामध्ये 500 बेडस् हे ऑक्सीजनची सुविधा असलेले बेडस् असून त्याला अखंडीतपणे ऑक्सीजनचा पुरवठा होईल अशी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोव्हीड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोव्हीड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भाेजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टी व्ही तसेच लाकर्सचीही सुविधाही आहे.
याशिवाय महापालिकेने शहरात १०० हून अधिक अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. ठाणे परिवहन सेवेने ३० बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले, असे असतानाही रविवारी एका रुग्णाला दोन दिवस अॅम्ब्युलन्स न मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इतकेच नव्हे तर व्हेंटिलेटरची कमतरता दिसत आहे. त्यामुळे एखाद्याने कॉल करून रुग्णवाहिका मागवली, तर व्हेंटिलेटर नाही, त्यात बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. ठामपाने बेडची माहिती अॅपद्वारे देणे सुरू केले होते. त्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रूमही तयार केली आहे. तेथे तीन शिफ्टमध्ये एकेक डॉक्टरची नियुक्ती केली आहे. परंतु, आता तेथील डॉक्टरही कॉल घेऊन कंटाळले असून, ते कॉल घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे रुग्णाला चार ते पाच तास खोळंबत राहावे लागत आहे.
0 टिप्पण्या