अन्यथा ठामपामधील कोट्यवधींचा भ्रष्टाचार गडप होईल - नारायण पवार
शहर विकास विभागात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत काही संगणक आणि फाईल्स नष्ट
ठाणे
शहर विकास विभागात काल (१५ जुन) रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत काही संगणक आणि फाईल्स नष्ट झाल्याचे समजते. या संदर्भात अद्यापि पालिकेकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र संगणकाला आग लावल्यानंतर संपूर्ण शहर विकास विभाग खाक करण्याचा डाव फसला असावा, असा संशय भाजपा नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केला आहे. सीआयडीने शहर विकास विभागातील गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीतील सर्व फाईल्स तत्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वेळीच पावले न उचलल्यास, कोट्यवधींचा भ्रष्टाचार गडप केला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली.
महापालिकेच्या शहर विकास विभागातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारांमुळे आगीचे सावट असल्याची भीती २६ फेब्रुवारी रोजी व्यक्त करून आयुक्तांकडे उपाययोजनांची विनंती भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली होती. मात्र, आता चार महिन्यांतच शहर विकास विभागात `आगीचा ट्रेलर’ दिसला. `स्फोटक फाईल्स भस्मसात करण्यासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचा आरोप करीत पवार यांनी सुमारे साडेपाच वर्षांच्या फाईल्स सीआयडीने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसेच या आगीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी नगरसेवक नारायण पवार यांनी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून शहर विकास विभागाला आग लावण्याचा संशय व्यक्त केला होता. शहर विकास विभागाने काही वर्षांपासून हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार वादग्रस्त बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, जोता प्रमाणपत्र, ओसी आणि टीडीआर देण्यात आल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही संशयास्पद प्रस्तावांबाबत अनेक तक्रारीही लाचलुचपत विभाग, मंत्रालय आणि सीआयडीकडे दाखल आहेत. त्याबाबत चौकशी सुरू आहे. तर काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही (पीआयएल) दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व फाईल्सचा `स्फोटक’ साठा सध्या शहर विकास विभागात आहे, याकडे नारायण पवार यांनी आयु्क्तांचे लक्ष वेधले होते. संभाव्य आगीपासून संरक्षण होण्यासाठी विभागातील इलेक्ट्रिक व्यवस्था, अग्निशमक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करण्याचीही विनंती नारायण पवार यांनी केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. काल रात्री लागलेल्या छोट्या आगीने माझी भीती दुर्देवाने खरी ठरत असल्याचे नारायण पवार म्हणाले.
0 टिप्पण्या