सामाजिक जीवनाला सुरुवात करा, मनातील भीती दूर होईल - प्रकाश आंबेडकर
मुंबई
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटायला सुरवात करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे.कोरोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे. ज्या पद्धतीने मिडिया आणि शासनाने कोरोना व्हायरस संदर्भात बातम्या दिल्या आहेत आणि ज्या पद्धतीने शासनाने कार्यक्रम आखला आहे, कदाचित तो खरा ही असेल. पण आता कुठेतरी लोकांची सुटका झाली पाहिजे. अशी आजची परिस्थिती आहे. मात्र याबाबत सरकार काही भूमिका घेईल असे आपल्याला वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सामान्य माणसाला माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा धरू नका, आपले मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना भेटायला सुरुवात करा, आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला जा, शासनाने आपल्या मनामध्ये जी भीती घातली आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपोआपच आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
0 टिप्पण्या